नागपूर : शहरभर कधीही कोसळू शकतील, अशा २६० इमारतींकडे मनपा दुर्लक्ष करीत आहे. काहींना नोटीस तर, काही प्रकरणे न्यायालयीन असल्याचे कारण पुढे करीत पळवाट शोधली जात आहे. अशा परिस्थितीत कुर्ला येथील घटनेची नागपुरात पुनरावृत्ती झाली तर जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर शहरात ४४२ शिकस्त इमारती आहेत. यातील ४४१ घरमालकांना मनपा प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. यातील १८२ घरे व इमारती पाडण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र यावर सर्वसामान्यांचा विश्वास नाही. प्रशासनाचा दावा खरा धरला तरी शहरात अजूनही २६० धोकादायक इमारती आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक प्रकरणे न्यायालयात असल्याचे सांगितले जाते. वास्तविक न्यायालयात खरी भूमिका मांडून इमारतीत जीव मुठीत धरून राहणाऱ्या वा व्यवसाय करणाऱ्यांच्या मृत्यूची प्रतीक्षा करण्यात येत असल्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी शिकस्त इमारत पाडण्याची नागरिकांची मागणी असूनही कारवाई होत नसल्याची माहिती आहे. आसीनगर झोनमध्ये असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आसीनगर झोनने दिलेल्या १० इमारतींच्या यादीतील सर्व इमारतींना नोटीस बजावली आहे. यातील एक पाडण्यात आली.
झोन कार्यालयांना अहवाल सादर करण्याचे निर्देश
मान्सूनपूर्व तयारीचा आढावा म्हणून मनपाच्या झोन कार्यालयांना त्यांच्या क्षेत्रातील शिकस्त घरांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. मात्र दरवर्षी पावसाळा आला की अशा इमारतींचा आढावा घेतला जातो. संबंधित विभागाला आदेश दिले जातात. प्रत्यक्षात पुढे कार्यवाही होत नसल्याचे वास्तव आहे.