लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यकर सहआयुक्त (वस्तू व सेवा कर) नागपूर विभागात राजपत्रित अधिकारी, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची २६५ पदे रिक्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. यामुळे नागपूरला स्मार्ट सिटी करण्याच्या शासनाच्या धोरणाला थोडीफार खीळ बसली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अधिकाऱ्यांना कारभार चालविण्यास त्रास होत असल्याची माहिती पुढे आली आहे. या विभागात गेल्या अनेक वर्षापासून पदभरती झालेली नाही. शासनाने रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी पुढे आली आहे.नागपूर विभागांतर्गत नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्याचा समावेश आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये क्षमतेपेक्षा अपुरे कर्मचारी आहेत. माहितीच्या अधिकारात राज्यकर आयुक्त आणि सहआयुक्तांच्या कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून हे सत्य समोर आले आहे.राजपत्रित अधिकाऱ्यांची १६ पदे रिक्तनागपूरमध्ये मंजूर ७० रात्रपत्रित अधिकाऱ्यांमध्ये राज्यकर सहआयुक्त एक, राज्यकर सहाय्यक आयुक्त दोन आणि राज्यकर अधिकाऱ्याचे एक अशी एकूण चार पदे रिक्त आहेत. याचप्रमाणे चंद्रपूर विभागात १६ मंजूर पदांमध्ये राज्यकर उपायुक्त एक आणि राज्यकर सहाय्यक आयुक्तांची दोन पदे अशी तीन पदे रिक्त आहेत. गोंदिया जिल्ह्यात ८ मंजूर पदांपैकी राज्यकर सहायक आयुक्तांची दोन पदे, गडचिरोली जिल्ह्यात मंजूर पाच पदांमध्ये राज्यकर अधिकाऱ्याचे एक पद, भंडारा जिल्ह्यात ६ मंजूर पदांपैकी राज्यकर अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त आहेत. अर्थात नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यात मंजूर १४२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांपैकी १२६ पदे भरली असून १६ रिक्त आहेत.१७५ तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरताशासकीय विभागाचा कारभार तृतीय कर्मचाऱ्यांमुळे चालत असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. पण नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात मंजूर ५१४ पदांपैकी ३३९ पदे भरली असून १७५ पदे रिक्त आहेत. यापैकी नागपूरमध्ये ५१, चंद्रपूरमध्ये ८६, गडचिरोलीत दोन, गोंदिया नऊ, वर्धेत सहा आणि भंडारा जिल्ह्यात सहा पदे रिक्त आहेत. यामध्ये राज्यकर निरीक्षक आणि कर सहाय्यकांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ७४ पदे रिक्तराज्यकर सहआयुक्त (वस्तू व सेवा कर) नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांमध्ये चतुर्थ श्रेणी संवर्गासह एकूण नऊ पदे आहेत. त्यामध्ये चपराशी हा शासकीय कार्यालयाचा दुवा समजला जातो. पण नागपूर विभागात चपराशांची ९७ पदे मंजूर असून त्यापैकी ४२ पदे भरली असून तब्बल ५५ पदे रिक्त आहेत.
राज्यकर आयुक्त नागपूर विभागात २६५ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 9:04 PM
राज्यकर सहआयुक्त (वस्तू व सेवा कर) नागपूर विभागात राजपत्रित अधिकारी, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची २६५ पदे रिक्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे.
ठळक मुद्देरिक्त पदे भरण्याची मागणी : कामकाजावर परिणाम