वर्षाला २० ते २२ कोटींचा खर्च : नेटवर्क नसल्याने टँकरशिवाय पर्याय नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमृत योजना २०१६ आली. या अंतर्गत शहरालगतच्या नॉन नेटवर्क भागात ४३ जलकुंभांचे निर्माण व पाईपलाईन टाकणे अपेक्षित होते; परंतु प्रकल्पाचे काम रखडल्याने शहरात २६५ टँकर सुरू आहेत.
अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा होत नसलेल्या शहरालगतच्या भागात पाण्याची पाईपलाईन, ४३ जलकुंभांचे निर्माण केले जाणार आहे. १६ जलकुंभ उभारण्यात यश आले. जागा उपलब्ध न झाल्याने इतर जलकुंभांचे काम रखडले, तसेच पाईपलाईनचेही काम संथच आहे. हा प्रकल्प पूर्ण न झाल्याने काही वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो.
२०२० पूर्वी ३६५ टँकरवर वर्षाला २८ ते ३० कोटींचा खर्च होत होता. मात्र, नेटवर्क क्षेत्रात वाढ झाल्याने २०२० मध्ये १०० टँकर कमी करण्यात आले. वर्षाला ८ ते १० कोटींची बचत झाली. आता शहरात २६५ टँकर सुरू आहेत. वर्षाला यावर १८ ते २० कोटी खर्च येतो. डिसेंबर २०२० मध्ये पुन्हा १०० टँकर बंद होणे अपेक्षित होतेा; परंतु प्रकल्पाचे काम रखडल्याने टँकर बंद झाले नाही.
...
जलकुंभांचे काम रखडले
डिसेंबर २०२० पर्यंत कळमना, नारा, वांजरा येथील जलकुंभांची कामे पूर्ण करून १०० टँकर बंद होणे अपेक्षित होते. मात्र, निर्धारित कालावधीत काम पूर्ण न झाल्याने शहरालगतच्या भागात २०० हून अधिक टँकर सुरू आहेत. दुसरीकडे नेटवर्क असूनही काही वस्त्यात कमी दाबाने वा दूषित पाणीपुरवठा होतो. यामुळे टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागतो.
..........जोड आहे...