नागपूर : मुंबईतील सेठ जीएस मेडिकल कॉलेज अँड केम हॉस्पिटल परेल येथे एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो असे सांगून तीन आरोपींनी २६.५२ लाखांनी गंडविल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मयंक अग्रवाल, कामरान खान, राकेश पाटील आणि आशिष जैस्वाल (सर्व रा. मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मधुबन अपार्टमेंट, सेंट्रल रेल्वे कॉलनी ओमकारनगर येथील रहिवासी गोपाल हरीशचंद्र पराते (वय ५९) यांची मुलगी मोनिका नीटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे तिला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता. दरम्यान, आरोपी कामरान खान याने पराते यांच्या मोबाईलवर कॉल करून बंगळूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. परंतु, पराते यांना महाराष्ट्रात प्रवेश पाहिजे असल्याने आरोपीने मुंबईतील सेठ जीएस मेडिकल कॉले अँड केम हॉस्पिटल परेल येथे प्रवेश मिळवून देतो असे सांगून त्यांना मुंबईला भेटीसाठी बोलावले.
तेथे कामरान खान याने आरोपी राकेश पाटील सोबत भेटण्यास सांगितले. राकेशने १ लाख १२ हजार ६१५ रुपयांचा डिमांड ड्राफ्ट कॉलेजच्या नावे मागितला. डीडी घेऊन पराते पुन्हा मुंबईला गेले असता आरोपी कामरानने मयंक अग्रवालला डीडी देण्यास सांगितले. पराते यांनी अग्रवालला डीडी दिला तेव्हा आरोपी राकेश पाटील तेथे हजर होता. नागपूरला आल्यानंतर पराते यांनी डीडीच्या पावतीबाबत विचारले असता मयंकने २५ लाख डोनेशन दिल्याशिवाय प्रवेश होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पराते यांनी १५ लाखांची जुळवाजुळव केली.
आरोपी मयंक अग्रवाल आणि राकेश पाटील यांनी पराते यांच्या घरी येऊन १५ लाख घेतले. त्यानंतर पराते यांना व्हॉट्सअपवर डीडी मिळाल्याची पावती पाठविली. पराते यांनी अलॉटमेंट लेटरबाबत विचारले असता त्यांनी आणखी १० लाख रुपये घेऊन मुंबईला येण्यास सांगितले. पराते मुंबईला येणे जमत नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपी कामरानने त्यांना आशिष जयस्वाल यांचे एस. बँक दिल्लीतील अकाऊंट नंबर पाठविला. पराते यांनी या अकाऊंटमध्ये आरटीजीएसने १० लाख पाठविले.
त्यानंतर आरोपींनी मुलीच्या ई मेलवर प्रोव्हिजनल ॲडमिशन लेटर पाठविले. पराते हे मुंबईला गेले असता त्यांना आरोपी भेटले नाहीत. त्यानंतर त्यांनी कॉलेजच्या डीनची भेट घेतली असता त्यांनी कागदपत्र तपासून ते बोगस लेटर असल्याचे सांगितले. याबाबत पराते यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
.............