- कोणी औषध, कोणी लसीकरण तर कोणी हॉस्पिटल बिलाबाबत केली विचारणा
मेहा शर्मा / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या दाढेत असलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर कंट्रोल रूम(सीसीसीआर)कडे गेल्या दहा दिवसांत २,६६१ गरजूंनी फोन कॉल करून मदत मागितली आहे. मनपाच्या म्हणण्यानुसार, शहरात कोरोना संक्रमणाला ओहोटी लागल्यापासून मदतीसाठी येणाऱ्या कॉल्सची संख्याही घसरली आहे. या काळात सर्वाधिक ३५८ कॉल १० मे रोजी आले होते, तर सर्वात कमी १९० कॉल १४ मे रोजी नोंदविले गेले.
एकूण २,६६१ कॉल्सपैकी १,७७५ रुग्णांना भरती करवण्यात आले, तर ६३ रुग्णांना डॉक्टरांनी गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला. ११९ रुग्णांनी स्वत:च स्वत:ला आयसोलेट करवून घेतले होते. ६५० रुग्णांनी नंतर प्रतिसाद दिला नाही, तर ४५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ५ मे रोजी २३२ कॉल्स बेड्सच्या उपलब्धतेसंदर्भात आले होते. त्यातील १७३ भरती झाले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ८ रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले होते. ४५ रुग्णांना नंतर प्रतिसाद दिला नव्हता, तर एका रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. ९ मे रोजी १२५ कॉल्स मिस झाले होते. उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता, त्यांनी बेड्सची संख्या वाढविल्यावर आणि संक्रमणाचा दर कमी झाल्यानंतर, फोन कॉल्सच्या संख्येत घट झाल्याचे सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार टोल फ्री नंबर मनपाकडून संचालित केले जात आहे. विचारपूस करण्यासाठी कोणताही फोन कॉल आल्यावर संबंधिताची संपूर्ण माहिती नोंदविली जात असल्याचे मनपाचे सीसीसीआर प्रभारी व सहायक आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले. त्यानंतर, रुग्णाला कॉल करून माहिती पुरविली जाते. अनेकदा काही रुग्ण आमच्याकडून गेलेल्या फोन कॉलला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे पुढची प्रक्रिया पूर्ण होत नाही. संक्रमणाचा वेग घसरल्याने आणि बेड्सची उपलब्धता वाढल्याने, फोन कॉल्सच्या संख्येतही घट झाली आहे. अनेक रुग्ण टोल फ्री क्रमांकावर औषध, लसीकरण व हॉस्पिटलच्या बिलासंदर्भातही फोन करत असतात. त्यांनाही मार्गदर्शन केले जात असल्याचे जलज शर्मा यांनी सांगितले.
...............