लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणपूरक असलेली बससेवा शहरात सुरू होऊ शकली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून २८ ग्रीन बसेस एमआयडीसी येथील डेपोत धूळखात पडल्या आहेत. परिणामी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्थेच्या स्वप्नाला मनपाच्या कामचुकार अधिकाऱ्यांमुळेच ग्रहण लागले आहे.नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था ही प्रदूषणमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न साकार करण्यासाठी २०१४ मध्ये ग्रीन बसची ट्रायल नागपुरात सुरु झाली. देशात पहिल्यांदाच इथेनॉलने ग्रीन बस नागपुरात धावली. खूप चर्चा झाली. ट्रायलच्या आकडेवारीच्या आधारावर डिसेंबर २०१६ मध्ये पाच ग्रीन बसेसचे लोकार्पण झाले. मार्च २०१७ पर्यंत त्यांची संख्या २५ वर पोहोचली. एकूण ५५ बसेस चालणार होत्या. जीएसटी लागू झाल्यानंतर स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने १८ टक्के अतिरिक्त रक्कम, सर्वसुविधा युक्त डेपो आणि ग्रीन बससाठी स्वतंत्र एस्क्रो अकाऊंट उघडण्याची मागणी केली. यासंदर्भात वारंवार सूचित करण्यात आले. मनपावर स्कॅनिया कंपनीची थकीत रक्कम वाढत गेली. ही रक्कम १० कोटीवर पोहोचली. कुठेही सुनावणी झाली नाही. अखेर कंपनीने नागपुरात बससेवा बंद करण्याचा अंतिम निर्णय घेतला. नितीन गडकरी यांनी दिल्लीत तातडीने बैठक बोलावून बससेवा पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न केले.यश आले नाही.
चार वर्षातच संपला प्रवासआॅगस्ट २०१४ मध्ये एका ग्रीन बसची ट्रायल नागपुरात सुरू झाली. संविधान चौक ते खापरी दरम्यान ही बस चालविण्यात आली.
पूर्णपणे वातानुकूलित हिरव्या रंगाची ही बस लोकांच्या आकर्षणाचे केंद्र होती. राष्ट्रीय स्तरावर याची चर्चा झाली. उत्तर प्रदेशातील लखनौ आणि गुजरातमधील अहमदाबाद या शहरातही ही बस ट्रायलसाठी नेण्यात आली. सर्वत्र कौतुक झाले.नागपुरात डिसेंबर २०१६ मध्ये ग्रीन बसचे लोकार्पण गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पाच बसेस सुरू झाल्या.५५ बसेस चालविण्याचा करार झाला होता. परंतु मार्च २०१७ पर्यंत केवळ २५ बसेस नागपूरच्या रस्त्यावर धावू शकल्या. ज्या बसेस चालल्या. त्यानुसार मनपाने कंपनीला रक्कम दिली नाही तसेच व्यवस्थित डेपो दिले नाहीत. अशा परिस्थितीत १२ आॅगस्ट २०१८ रोजी स्कॅनिया कंपनीने शहरातून ग्रीन बसेसचे संचालन बंद केले.
पुढच्या आठवड्यात घेणार बैठकमनपा परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सांगितले की, ग्रीन बसला पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढच्या आठवड्यात बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीत एस्को अकाऊंट, डेपो आणि इतर मुद्यांवर चर्चा करून ते सोडवण्यात येतील.