नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवार (दि. १) पासून शहरात मोकाट डुकरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. तमिळनाडूच्या पथकाने गुरुवारी धरमपेठ झोन क्षेत्रातील २८ डुकरे पकडली; तर पहिल्याच दिवशी बुधवारी १८ डुकरे पकडली होती.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स कार्यालय परिसरातील नाला, आरटीओ नाला, गिट्टीखदान, केटीनगर भागात डुकरे पकडण्याची कारवाई करण्यात आली. शहरात मोकाट डुकरांचा त्रास वाढल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नरेंद्रनगर येथील नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवान व पोलिसांच्या उपस्थितीत २५ जाणांच्या पथकामार्फत ही मोहीम राबविली जात आहे. यापूर्वी २०१९ मध्ये तमिळनाडूहून आलेल्या पथकाने मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम राबविली होती. जवळपास ५०० डुकरे पकडण्यात आले होती, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.