लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संकटामुळे रशियात अडकलेले २८ विद्यार्थी सकाळी विशेष विमानाने नागपुरात दाखल झाले. ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ते मायदेशी परतले. यात पुणे, ठाणे, औरंगाबाद व मुंबईतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांना सोडून देण्यासाठी एसटी महामंडळाने बस उपलब्ध करून दिली. त्यातून हे सर्वजण सोमवारी सकाळी रवाना झाले.रशियात अडकलेल्या शंभराहून अधिक भारतीयांना वंदे भारत अभियानांतर्गत स्वदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मॉस्कोहून या प्रवाशांना दिल्लीत आणण्यात आले. महाराष्ट्रातील रहिवाशांना दिल्लीहून विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आणण्यात आले. सोमवारी पहाटे ४.३० वाजता या विमानाने नागपूर विमानतळ लँडिंग केले. नियमानुसार सर्व प्रवाशांची तपासणी करून हातावर होम क्वारंटाईनचे स्टॅम्प लावण्यात आले. नागपूर व लगतच्या भागातील प्रवाशांनी वाहनांची सोय करून ठेवली होती.या विमानातून पुणे, ठाणे, औरंगाबाद व मुंबईच्या २८ प्रवाशांचेही आगमन झाले. जिल्हा प्रवेशबंदी कायदा लागू असल्याने वाहनांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही. कायदेशीर अडचण असल्याने प्रशासनाकडून एसटी महामंडळाकडे मदतीसाठी विचारणा करण्यात आली. महामंडळाने प्रवाशांना सोडून देण्याची तयारी दाखवत बस उपलब्ध करून दिली. सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही बस नागपूर विमानतळावर पोहोचली. या ठिकाणी नियमानुसार सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर ही बस प्रवाशांना घेऊन रवाना झाली.यापूर्वी शुक्रवारीही दोहाहून १४७ प्रवासी नागपुरात पोहोचले. यात भोपाळ व इंदूरच्या सुमारे १५ प्रवाशांचा समावेश होता. एसटी महामंडळाच्या बसमधूनच त्यांना त्यांच्या शहरात सोडून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
रशियात अडकलेल्या २८ विद्यार्थ्यांना पोहोचविले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 10:56 PM