लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) दोन दिवसीय ‘बँक बंद’ संपामुळे पहिल्या दिवशी बँकांचे कामकाज आणि २८०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. बंदचा फटका व्यावसायिक आणि वरिष्ठ नागरिकांना बसला. अनेक खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागला. पहिल्याच दिवशी कॅश ट्रान्सफर, कॅश विड्रॉॅवल, क्लिअरिंग आणि आरटीजीएस सेवा ठप्पा होत्या. संपात नागपुरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे जवळपास ७ हजारांपेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. बँकांचे कामकाज शनिवार, १ फेब्रुवारीला बंद राहणार आहे.यूएफबीयूच्या बॅनरखाली राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता बँक ऑफ इंडियाच्या किंग्जवे मुख्य शाखेसमोर एकत्र आले आणि आयबीआय व सरकारच्या धोरणाविरुद्ध नारे-निदर्शने केली. त्यानंतर सिव्हील लाईन्स येथील अलाहाबाद बँकेसमोर शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले. बँकेच्या संपात यूएफबीयूशी संलग्न एआयबीईए, एआयबीओसी, एनसीबीई, एआयबीओए, बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, एनओबीडब्ल्यू आणि एनओबीओ या नऊ संघटनांचे देशातील १० लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले.आयबीए आणि सरकारच्या धोरणाचा निषेधयूएफबीच्या नागपूर चॅप्टरचे समन्वयक सुरेश बोभाटे सभेला मार्गदर्शन करताना म्हणाले, वेतन संशोधन नोव्हेंबर २०१७ ला होणार होते. पण आयबीए आणि सरकारच्या धोरणामुळे होऊ शकले नाही. त्याचा निषेध करण्यात येत आहे. ईएमबीईएचे महासचिव जयवंत गुरवे म्हणाले, बँकेच्या कर्मचाऱ्यांना अन्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या तुलनेत कमी वेतन मिळत आहे. ३० महिन्याच्या चर्चेच्या शृंखलेनंतर आयबीएने केवळ १२.२५ टक्के वेतन वाढीसह सुधारणा केली आहे.सभेत बीईएफआयचे व्ही.व्ही असई, आयएनबीओसीचे नागेश डांडे, एआयबीओसीचे दिनेश मेश्राम, एआयबीओएचे विजय मेश्राम, एनसीबीईचे कमल रंगवानी, एनओबीओचे विक्की दहीकर, एनओबीडब्ल्यूचे नितीन बोरवकर, निवृत्त असोसिएट्चे ओमप्रकाश वर्मा यांनी मार्गदर्शन केले. सभेचे संचालन ईएमबीईएचे चेअरमन सत्यशील रेवतकर यांनी केले.अशा आहेत मागण्या :
- वेतन स्लीप घटकांमध्ये २० टक्के पगारवाढ
- कामकाजाचा पाच दिवसाचा आठवडा
- बेसिक पेसह विशेष भत्त्याचे विलिनीकरण
- पेन्शनचे अपग्रेडेशन
- परिचालन लाभाच्या आधारावर कर्मचारी निधीचे वितरण
- सेवानिवृत्ती लाभात आयकर सूट
- समान काम समान वेतन
- अधिकाऱ्यांची कामाची वेळ मर्यादित करावी
सभेत चेंदिल अय्यर, अंजली राणा, वीरेंद्र गेडूाम, प्रकाश भागवतकर, सत्यप्रकाश तिवारी, मिलिंद वासनिक, श्रीकृष्ण चेंडके, भूषण महाजन, राहुल गजभिये, वजीर मेश्राम, रत्ना धोरे, प्रदीप केळकर, बबलू कोल्टे, दिलीप पोटल, विजय ठाकूर, वासनिक, संजय कुंठे, लिलिट उपसे, नारायण उमरेडकर, इम्तियाज आदींसह यूएफबीयूशी संलग्न संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवार, १ फेब्रुवारीला किंग्जवे येथील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर सकाळी १०.३० वाजता नारे-निदर्शने करण्यात येणार आहे.
‘एटीएम’ रिक्त होणारबँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संप दोन दिवसांचा असून तिसऱ्या दिवशी रविवार आल्याने बँकेचे कामकाज सलग तीन दिवस बंद राहणार आहे. आर्थिक व्यवहार सोमवारी सुरू होतील. संपामुळे नागपुरातील अनेक एटीएम रिक्त होणार आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसणार आहे. बँकांच्या बंदमुळे अनेकांनी पहिल्याच दिवशी एटीएममधून मोठ्या प्रमाणात रक्कम काढली. त्यामुळे काही एटीएममध्ये रक्कम नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.