उमरेड : उमरेड विधानसभा क्षेत्रात लसीकरणासोबतच नवीन मतदार नोंदणी प्रयोग यशस्वी ठरत आहे. मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असून उमरेड विधानसभेत नमुना ६ अंतर्गत एकूण २,८३८ नवीन मतदारांचा समावेश मतदान यादीत करण्यात आला आहे. १ जानेवारी ते १७ जून २०२१ पर्यंत या नवीन मतदारांची नोंद घेण्यात आली आहे. नमुना ७ अंतर्गत मतदार यादीमधील असलेले नाव कमी करण्यासाठी २,२६५ जणांचे अर्ज दाखल होत मंजूरही झाले. नमुना ८ मध्ये नावात, वयाबाबतची दुरुस्ती असल्यास ती करता येते. यासाठी सुद्धा तब्बल ८०० मतदारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे. पत्ता दुरुस्ती वा बदल करण्यासाठी नमुना ८ अ च्या अर्ज सादर करावा लागतो. उमरेड विधानसभेतील एकूण ९४ जणांनी यासाठी अर्ज सादर केला.
नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती करण्याचे काम सुरू असून ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांनी आपली नावे समाविष्ट करावीत. तसेच १ जानेवारी २०२१ ला ज्या व्यक्तीस वयाची १८ वर्षे पूर्ण झालीत त्यांनीही ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन उमरेड विधानसभा क्षेत्राचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांनी केले आहे.