नागपूर: राज्य मागासवर्ग आयोगामार्फतच्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी नागपूर विभागात २९ हजार ४२ प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या २३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणासंदर्भात उच्चस्तरीय आढावा घेतला. त्यानुसार ३१ जानेवारी पर्यंत सर्वेक्षणाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे.
नागपूर विभागातील ६४ तालुक्यातील तसेच महानगरपालिका हद्द अशा ८,४२९ गावात गावातील १ कोटी १७ लाख ५३ हजार ५२ लोकसंख्या, तसेच २६ लाख ९३ हजार ४३३ घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी २९,०४२ प्रगणकांच्या सेवा घेण्यात येणार आहे.त्यासोबतच २२३ राखीव प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १,९७० पर्यवेक्षक तसेच १८८ राखीव पर्यवेक्षक नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली. १५० प्रगणकाची नियुक्ती करताना १५० ते २०० कुटुंबासाठी एक प्रगणक आणि १५ प्रगणकांसाठी एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आला आहे. प्रगणक व परीक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
असे होणार नागपूर विभागात सर्वेक्षणजिल्हा - घरांची संख्या - लोकसंख्या -
- नागपूर महानगरपालिका - ५,२७,६३४ - २४,०५,६५६
- नागपूर जिल्हा - ४,४२,८९७ - २२,१४,४८५
- वर्धा - ३,०९८४६ - १३, ००,१३
- भंडारा - २,७८,०७६ - १२,००,३३४
- गोंदिया - २,९२,३६९ - १३,२२,५०७
- चंद्रपूर महानगरपालिका - ६९,८६९ - ३,५२,४१७
- चंद्रपूर जिल्हा - ४,७०,९८२ -१८,८३,९२८
- गडचिरोली - ३,००,७६० - १०,७२, ९४२