लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी शहरातील भाजीमंडी परिसरात केलेल्या कारवाईमध्ये मांसाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण २९ लाख ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. २५) सकाळी ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
ट्रकचालक शेख मोहम्मद शेख अब्दुल कुरेशी (५२, रा. भाजीमंडी, कामठी) व मालक तसलिम अहमद फय्याज अहमद (२५, रा. विणकर कॉलनी, कामठी), अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. कामठी शहरातील भाजीमंडी परिसरातून मांसाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी या भागाची पाहणी केली. यात त्यांनी एमएच-४०/एटी-२०२० क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये त्यांना गुराचे मांस आढळून आले. ते रासायनिक प्रक्रिया करून हैदराबादला नेले जात हाेते.
ती विना परवानगी वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी ट्रकचालकासह मालकास अटक केली. त्यांच्याकडून १५ लाख रुपयाचा ट्रक आणि १४ लाख ४० हजार रुपये किमतीचे १२ टन मांस असा एकूण २९ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार सतीश मेंढे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, सहायक फाैजदार विनायक आसटकर, हेड कॉन्स्टेबल मनोहर राऊत यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.