लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे निकाल घोषित झाले आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल २९.५२ टक्के तर बारावीचा निकाल १८.६३ टक्के लागला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेद्वारे पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. नोव्हेंबर- डिसेंबर २०२० या कालावधीत पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत नागपूर बोर्डातून ३७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ११११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी २९.५२ आहे. तर बारावीच्या परीक्षेत नागपूर बोर्डातून ५७१६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यातील १०६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी १८.६३ टक्के आहे. दहावीच्या परीक्षेत नागपूर बोर्डाचा राज्यातून सर्वात कमी निकाल लागला आहे. तर बारावीच्या परीक्षेत नागपूर बोर्ड चौथ्या क्रमांकावर आहे. यंदा कोरोनामुळे पुरवणी परीक्षा उशिरा घेण्यात आल्या तरी निकाल अवघ्या १४ दिवसात घोषित करण्यात आला आहे.