दयानंद पाईकराव
नागपूर : कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शंका व्यक्त करण्यात आल्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी बसेसला अँटीमायक्रोबियल कोटिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील ४३४ बसेसपैकी २९६ बसेसला ही कोटिंग करण्यात आली आहे. दोन महिन्यानंतर पुन्हा या बसेसला कोटिंग करण्यात येणार असून, सध्या २९६ बसेस कोरोना फायटर म्हणून प्रवाशांना सेवा पुरवित आहेत.
किती बसेसना झाले कोटिंग?
आगार एकूण बसेस कोटिंग झालेल्या बसेस
-गणेशपेठ ८० ६५
-घाट रोड ६४ ४४
-इमामवाडा ५५ ३४
-वर्धमाननगर ४१ ३३
-काटोल ५३ ३३
-सावनेर ५० ३४
-उमरेड ४८ २४
-रामटेक ४२ २९
एका एसटीला दोन महिन्यातून एकदा होणार कोटिंग
एकदा कोटिंग केल्यानंतर दोन महिने त्याचा प्रभाव राहाणार आहे. एखाद्या प्रवाशाला कोरोना असला आणि त्याने एसटीच्या आतील कोणत्याही भागाला हात लावल्यास कोरोनाचा विषाणू नष्ट होईल. त्यामुळे प्रवाशांना आता एसटी बसने प्रवास करताना मनात भीती ठेवण्याची गरज उरलेली नाही.
मास्कचे पालन आवश्यक
-एसटी महामंडळाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रवाशांना बाधा होऊ नये यासाठी एसटी बसेसला अँटीमायक्रोबियल कोटिंग केले आहे. परंतु तरीसुद्धा अनेक प्रवासी कोरोनाच्या नियमाकडे दुर्लक्ष करत आहेत. काही प्रवासी विनामास्क प्रवास करताना दिसतात. त्यामुळे अशा प्रवाशांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. एखादा प्रवासी कोरोनाबाधित असला आणि त्याचा हात जरी एसटीच्या कोणत्याही भागास लागला तरी कोरोनाचे विषाणू नष्ट होतील. परंतु त्याच्या श्वासावाटे विषाणू दुसऱ्या प्रवाशाच्या शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने मास्क घालणे गरजेचे आहे.
प्रवाशांना ताकीद द्यावी
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व बसेसला अँटीमायक्रोबियल कोटिंग केले ही अतिशय चांगली बाब आहे. परंतु अनेक प्रवासी मास्क वापरत नाहीत. त्यामुळे एसटी महामंडळाने अशा प्रवाशांना ताकीद देण्याची गरज आहे.
- सुनील नारनवरे, प्रवासी
मास्क नाही तर प्रवास बंदी करा
अनेकजण निष्काळजीपणा करून मास्क घालत नाहीत. अशा प्रवाशांना एसटी बसमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. त्यांच्यामुळे इतरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
-रणधीर कांबळे, प्रवासी
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोटिंग
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने एसटी बसेसला अँटीमायक्रोबियल कोटिंग करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नऊ हजार बसेसला ही कोटिंग करण्यात येणार आहे. नागपूर विभागात ४३४ पैकी २९६ बसेसला ही कोटिंग करण्यात आली आहे. आगामी काही दिवसातच उर्वरित बसेसला ही कोटिंग करण्यात येणार आहे.
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
............