नामप्रविप्राची सोडत : व्हर्च्युअल सोडतीला लाभार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (नामप्रविप्रा) उभारलेल्या प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक ३ अंतर्गत उर्वरित २९८० घरकुलांची सोडत सोमवारी काढण्यात आली. आभासी प्रणालीच्या (व्हर्च्युअल) माध्यमाने काढण्यात आलेल्या घरकुल सोडतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते सोडत काढण्यात आली. सोडतीत क्रमांक लागलेल्यांची यादी जाहीर करण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जयस्वाल आदी उपस्थित होते.
या योजनेमार्फत सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. त्यांच्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नितीन राऊत यांनी या प्रसंगी केले. घरकुलांची वैशिष्ट्ये व घरकुलासंदर्भात आवश्यक सर्व माहिती महानगर आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली. घरकुलांसाठी विजेते घोषित करण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर मागणी पत्रकाप्रमाणे भरणा करून आवश्यक कागदपत्रे जमा करून घरकुलांचा ताबा घ्यावा, असे आवाहनही मनोजकुमार यांनी केले.
व्हर्च्युअल पद्धतीने पार पडलेल्या सोहळ्यात घरकुल लाभलेल्या लाभार्थ्यांना आपली नावे https://pmay.nitnagpur.org या वेबसाईटवर पाहता येणार आहे. घरकुलांची रक्कम, त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र इत्यादी सर्व माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
सदर स्थित नामप्रविप्राच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मनोजकुमार सूर्यवंशी, खासदार कृपाल तुमाने, नासुप्रचे उपजिल्ह्याधिकारी अविनाश कातडे, नामप्रविप्राचे अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये आणि कार्यकारी अभियंता(प्रकल्प) प्रशांत भांडारकर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार प्रकल्प कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर यांनी मानले.
...
अशी आहेत सोडतीतील घरकुले
४३४५ घरकुलांपैकी उर्वरित २९८० घरकुलांसाठी सोडत काढण्यात आली. या २९८० घरकुलांमध्ये ख.क्र. ६३ मौजा तरोडी (खुर्द) येथील १७३७ घरकुले शिल्लक, ख.क्र. ६२ मौजा तरोडी (खुर्द) येथील ६६० आणि ख.क्र. १२/१-२ मौजा वांजरी येथील ५८३ घरकुलांचा समावेश आहे.