लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी रात्री आलेल्या वादळी पावसादरम्यान चॉक्स कॉलनी येथे विजेची तार तुटून पडली. या अपघातात परिसरातील तीन श्वानांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तार तुटल्यानेच हा अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महावितरणने मात्र यासंदर्भात काहीही स्पष्ट केलेले नाही.
सुशील सोमकुवर व इतर नागरिकांनी पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे झाडांची एक मोठी फांदी विजेच्या तारावर पडली. त्यामुळे तार तुटून रस्त्यावर पडले. थोड्याच वेळाने जमिनीवर करंट पसरला. नागरिकांच्या गेटपर्यंत हा करंट आला. त्यामुळे तीन पाळीव श्वानांचा करंट लागून मृत्यू झाला. यात दोन जर्मन शेवर्डचा समावेश आहे. या प्रकरणाची तक्रार तातडीने महावितरणकडे करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी रात्री १२.३० वाजता घटनास्थळी पोहोचून तार काढून घेतले. सकाळी नागरिकांनी यशोधरा पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची तक्रार केली.
बॉक्स
अनेक तास अंधार
महावितरणने सायंकाळी पा...... वाजेपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत केलेला नव्हता. तक्रार केल्यावर असे सांगण्यात आले की, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. दुसरीकडे सुशील सोमकुवर यांचे म्हणणे आहे की, परिसरातील नागरिकांनी संबंधित झाडांच्या फांद्या छाटण्याबाबत दोन वेळा महावितरणकडे मागणी केली. परंतु काहीही झाले नाही.
बॉक्स
अनेक परिसर अंधारात
शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीज गेली. सदर, काटोल रोड, फ्रेण्ड्स कॉलनी, बोरगाव, मेडिकल परिसरात विजेचा लंपडाव सुरू होता. इतरही अनेक भागांमध्ये जम्पर व कंडक्टर तुटल्यामुळे कित्येक तास वीज नव्हती.