नागपूर : अंबाझरी परिसरातील एका ग्राहकाला कथित वीज बिल भरावयाचे ॲप डाऊनलोड करणे चांगलेच महागात पडले. या ग्राहकाच्या खात्यातून अज्ञात सायबर गुन्हेगाराने ३ लाख रुपये काढून घेतले. विशाल गेंदलाल चौधरी (४१, हिलटॉप) असे तक्रारकर्त्या वीज बिल ग्राहकाचे नाव आहे.
२४ जूनला दुपारी ३ वाजता चौधरी यांनी त्यांचे वीज बिल भरण्यासाठी एक ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांना एका अज्ञात व्यक्तीच्या मोबाइलवरून फोन आला. आरोपीने चौधरी यांना बिल चुकविण्यासाठी त्यांच्या बँक खात्याची माहिती मागितली. त्यानंतर चौधरी यांच्या बँक खात्यातून २ लाख ९९ हजार १०० रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाले. चौधरी यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणूक आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.