नागपूर : ऑनलाइन जॉब देण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका तरुणाला चक्क ३ लाखांनी गंडविल्याची घटना जरीपटका परिसरातून समोर आली आहे.
दिवसेंदिवस ऑनलाइनचे जाळे जगभरात जसे पसरत आहे, तशा सायबर गुन्हेगारीच्या विविध घटना पाहाण्यात येत असून यात वाढत होत चालली आहे. कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन वर्क, ऑनलाइन जॉबच्या प्रकारात बरीच वाढ झाली. त्यातून फसवेगिरीच्या बऱ्याच घटना समोर आल्या. ऑनलाइन लॉटरी, केबीसी आदिचे मॅसेजेस सोशल मिडीयावर पाठवून लुबाडण्याचे प्रकार दररोजच समोर येत असतात. नागपुरातही एका तरुणाला आणि त्याच्या कुटुंबियांना याचा लाखांनी फटका बसल्याचे उघडकीस आले आहे.
जरीपटका येथील रहिवासी चंपुरन ममतानी यांना १८ ऑगस्टला एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्याने ममतानी यांना घरबसल्या ऑनलाइन पैसे कमावण्याची ऑफर दिली. त्याने सांगितल्यानुसार ममतानी यांनी इंटरनेटवर आपले अकाउंट तयार केले. ममतानी यांनी आपला आणि कुटुंबीयांच्या खात्यातून आरोपीच्या खात्यात ३ लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर काहीच मिळकत झाली नसताना आरोपीने ममतानी यांना पैसे मागणे सुरूच ठेवले. त्यानंतर ममतानी यांना शंका आल्यामुळे त्यांनी जरीपटका पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणूक, आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.