चिटर्स ॲण्ड कंपनीचे नागपूर डेस्टिनेशन - अनेक कारागृहात, तरीही फसगत सुरूच
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचे हृदयस्थळ अन् राज्याची उपराजधानी असलेले नागपूर ठगबाजांच्या कंपन्यांचे डेस्टिनेशन बनले की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या दहा वर्षात नागपुरात आठ मोठे आर्थिक घोटाळे उघड झाले असून चिटर्स ॲण्ड कंपन्यांनी नागपूरसह देशातील अनेकांना ३ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घातला आहे.
महाठग विजय गुरनुलेच्या रिअल ट्रेड आणि मेट्रो कंपनीने देशभरातील १५ हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांना ७० ते १०० कोटींचा गंडा घातल्याची खळबळजनक माहिती उघड झाल्यानंतर गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. हवालदिल झालेले पीडित गुंतवणूकदार आता पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी चकरा मारत आहेत. सध्या बनवाबनवीचा हाच ‘हॉट टॉपिक’ सर्वत्र चर्चेला आला आहे. या घोटाळ्याच्या संबंधाने जुन्या आठवणीही ताज्या झाल्या आहेत. नव्हे, गेल्या १० वर्षातील ठगबाजींची प्रकरणेही पुन्हा नव्याने पोलिसांच्या रेकॉर्डवर आली आहेत.
कमी आणि सुलभ किस्तीत भूखंड किंवा दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून २०१० मध्ये महादेव लॅण्ड डेव्हलपर्सचा संचालक प्रमोद अग्रवाल याने हजारो गुंतवणूकदारांचे सुमारे १५० कोटी रुपये गिळंकृत केले होते. त्याच्या घोटाळ्याने नागपूर-विदर्भात खळबळ उडवून दिली असताना २०११ मध्ये वर्षा आणि जयंत झामरे या ठगबाज दाम्पत्याने नागपूरकरांचे २०० कोटी रुपये हडपले. २०१२ - १३ मध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे १५० कोटी रुपये घेऊन हरिभाऊ मंचलवार नावाचा ठग पळून गेला. तर २०१३ मध्ये समीर जोशीच्या श्रीसूर्या समूहाने हजारो ठेवीदारांना टोपी घालून त्यांचे सुमारे ७०० कोटी रुपये हडपले. या घोटाळ्याच्या तपासाची फाईल बंद होण्यापूर्वीच देवनगर चौकातील राजेश जोशीच्या बनवाबनवीला तोंड फुटले. त्याने ठेवीदारांचे सुमारे २०० कोटी रुपये गिळंकृत केले. तर, या सर्व घोटाळ्यांवर मात करणारा महाघोटाळा २०१४ मध्ये उघड झाला. प्रशांत वासनकर आणि त्याच्या नातेवाईकांनी हजारो गुंतवणूकदारांचे वेल्थ मॅनेजमेंटच्या नावाने १५०० कोटी रुपये गिळंकृत केले.
---
पुन्हा एकदा तेच ते...
विशेष म्हणजे, लोकमतने या सर्व घोटाळ्यांचे सूक्ष्म अन् सविस्तर वृत्तांकन करून जनजागरण केले. पोलिसांनी या सर्व घोटाळेबाजांना कारागृहात डांबले. नागिरकांनीही सतर्कता बाळगल्याने काही काळ का होईना घोटाळेबाज शांत होते. मात्र, रिअल ट्रेडच्या घोटाळ्यामुळे पुन्हा एकदा नागपूर आणि आर्थिक घोटाळ्याचा विषय सर्वत्र चर्चेला आला आहे.
---
सर्वांचा एकच फंडा
फसवणूक करणाऱ्या सर्वांचा एकच फंडा आहे. तो म्हणजे, वर्षभरात, दोन वर्षात रक्कम दुप्पट करून देण्याचा. याच फंडेबाजीला गुंतवणूकदार बळी पडत आहेत आणि अल्पावधीत रक्कम दुप्पट करण्याच्या नादात स्वत:ची रक्कम गमावून बसत आहेत.
---