सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने वाढत असताना आता मृत्यूंचे प्रमाणही वाढू लागले आहे. मागील २० दिवसात नागपूर जिल्ह्यात २५१ कोरोनाबाधितांचे जीव गेले. यातील एकट्या मेयो रुग्णालयातील ९० रुग्ण आहेत. धक्कादायक म्हणजे, उपचारासाठी आलेल्या ३० रुग्णांचे मृत्यू अवघ्या २४ तासांच्या आत झाले आहेत. पॉझिटिव्ह येऊनही घरीच राहून उपचार करण्याची व गंभीर झाल्यावरच रुग्णालयात जाण्याची वृत्ती वाढल्याने कमी अवधीत मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोज हजार रुग्णांची भर पडत असताना दुसऱ्या आठवड्यात वाढून दोन हजारांवर गेली. मागील आठवड्यात तर दैनंदिन रुग्णसंख्या तीन हजारांवर गेली आहे. यातच मृतांची संख्याही वाढू लागली आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) कोविड हॉस्पिटलमध्ये १ ते २० मार्च दरम्यान ९० रुग्णांचा मृत्यू झाला. यात १ मार्च रोजी ३, २ मार्च रोजी ४, ३ मार्च रोजी १, ४ मार्च रोजी ३, ५ मार्च रोजी ३, ६ मार्च रोजी १, ७ मार्च रोजी २, ८ मार्च रोजी ३, ९ मार्च रोजी ४, १० मार्च रोजी २, ११ मार्च रोजी २, १२ मार्च रोजी ६, १३ मार्च रोजी ६, १४ मार्च रोजी ८, १५ मार्च रोजी ६, १६ मार्च रोजी ३, १७ मार्च रोजी ९, १८ मार्च रोजी ५, १९ मार्च रोजी १२ तर २० मार्च रोजी ७ रुग्णांचे जीव गेले. या शिवाय, ५ रुग्णांचा रुग्णालयात येण्यापूर्वीच मृत्यू (ब्रॉट डेड) झाला होता. यात उपचार सुरू होऊन २४ तासातच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
-उपचाराच्या दोन दिवसातच १८ मृत्यू
रुग्णालयात भरती होऊन २४ तास होत नाहीत तोच मागील २० दिवसात ३० रुग्णांचे बळी गेले. या शिवाय, दोन दिवसांच्या आत १८, तीन ते पाच दिवसात २५, सात दिवसांत १० तर सात दिवसांवर उपचार घेत असलेल्या सात रुग्णांचे बळी गेले आहेत.
सर्वाधिक मृत्यू ७० वर्षांवरील रुग्णांचे
मेयोमधील ९० मृतांमध्ये ५३ पुरुष व ३७ महिला आहेत. यात ७० वर्षांवरील २५, ६१ ते ७० वयोगटातील २२, ५१ ते ६० वयोगटातील २४, ४१ ते ५० वयोगटातील १२, ३१ ते ४० वयोगटातील ५ तर ३० पेक्षा कमी वयोगटातील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मेयोतील २० दिवसांतील कोरोना मृत्यू
२४ तासात : ३० मृत्यू
२ दिवसात : १८ मृत्यू
३ ते ५ दिवसात : २५ मृत्यू
७ दिवसात : १० मृत्यू
७ दिवसांपूर्वी : ७ मृत्यू