गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील कृषी क्षेत्रावर पसरलेल्या विदेशी प्रजातींमुळे सुमारे ३० टक्के पिकांचे नुकसान होत असते. या प्रजातींच्या निर्मूलनासाठी योजना असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत. थातूरमातूर निर्मूलन करून उच्चाटन होत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहे. मात्र यावर अद्यापही ठोस उपाययोजना अमलात आलेली नाही. (agriculture )
नॅशनल ब्युरो ऑफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसने या विदेशी प्रजातींवर अध्ययन केले. भारतात सुमारे १८ हजार प्रजाती विदेशी असल्याचे अभ्यासात पुढे आले आहे. एवढेच नाही तर, यामुळे दरवर्षी ३० टक्के पिकांचे नुकसान होते, असेही यात स्पष्ट झाले आहे. विदेशी मूळ असलेल्या या वनस्पती व झाडांमुळे जैवविविधतेवर परिणाम होत असून पर्यावरणाचेही नुकसान होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
भारतात ४० टक्के वनस्पती व वृक्ष विदेशी मुळाची आहेत. यातील ५५ टक्के अमेरिकन आहेत. नॅशनल ब्युरो ऑफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसच्या अभ्यासानुसार विदेशी मूळ असलेल्या २५ टक्के वनस्पती व झाडे अतिशय आक्रमक असून त्या झपाट्याने वाढतात. देशी झाडांना संपवतात. बेशरम, गाजरगवत, लॅन्टेना या सारख्या वनस्पती हे उत्तम उदाहरण आहे.
कृषी आणि पर्यावरण विभागाकडून यासाठी अद्यापही गंभीरपणे विचार होताना दिसत नाही, याचा खेद आहे. कृषी क्षेत्रासोबतच जंगलातही या वनस्पती वाढत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. कृषी विभागाने चारा वाढविण्यासाठी देशी प्रजाती सुचविण्यासोबतच विदेशी प्रजातींचा नायनाट करणाऱ्या प्रजातींसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे.
- प्रा. गजानन मुरतकर, गवत अभ्यासक, अचलपूर
देशी झाडे व औषधी वनस्पतीवर भर हवा
देशी वृक्ष आणि औषधी वनस्पती पर्यावणाला पूरक आहेत. स्थानिक भूप्रदेशात त्या सहज रुजतात. जैविविधता जोपासण्यासोबत विदेशी वनस्पती संपविण्यासाठी याची गरज आहे. कुसळी, मार्बल, गोंधळी या सारखे उंच वाढणारे देशी प्रजातींचे चारा गवत उपलब्ध असतानाही इंडियन ॲग्रीकल्चर रिसर्च इन्टिट्यूटकडूनही विदेशी प्रजातींचे चारा गवत सुचविले जाते, हे आश्चर्यकारक आहे. कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा प्रा. मुरतकर यांनी व्यक्त केली आहे. वृक्षलागवड मोहिमेतही देशी झाडे लावण्यावरच भर देण्याची गरज पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त होत आहे.
...