लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील हजरत बाबा ताजुद्दीन यांचा ताजबाग येथील दर्गा परिसराचा विकास महाराष्ट्र शासनाकडून केला जात आहे. ताजबाग विकास आराखड्यातील कामांसाठी शासनाने १३२ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी दिली असून यापैकी ३० कोटींचा निधी शासनाने वितरित केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताजबाग विकास आराखड्याला निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक भूमिका त्यावेळी घेतली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विकास आराखड्याची कामे सुरू झाल्यानंतर अनेकदा कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी बैठकी घेतल्या आहे. एवढेच नव्हे तर कामाची प्रत्यक्षात पाहणीही पालकमंत्र्यांनी यापूर्वी केली आहे.या कामांच्या दरम्यान ताजबाग दर्गा समितीच्या मागण्या व सुविधांची व्यवस्था करण्याचे तसेच कामाचा दर्जा चांगला असावा असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले होते. या आराखड्याकरिता सन २०१९-२० या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी विभागीय आयुक्त यांना उपलब्ध करून देण्यात येणार होता. विभागीय आयुक्तांनी ३१ जुलैच्या पत्रान्वये वित्त विभागाला शासकीय परिपत्रकानुसार ६० टक्केच्या मर्यादेत ३० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.विकास आराखड्यातील ५३ मोठ्या बांधकामासाठी ५०.१० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. यात पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा, १०१ पर्यटन केंद्र्रे, ५३ मोठी बांधकामे यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. वितरित केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र विभागीय आयुक्तांनी तात्काळ शासनाला सादर करावे असे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत.
ताजबाग परिसराच्या विकासासाठी ३० कोटी वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 7:58 PM