लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारडी येथे अत्याधुनिक बाजार निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यात बाजाराची तीन मजली इमारत राहणार आहे. यातून लहान व्यवसायींना व्यवसायासाठी संधी उपलब्ध होणार आहे. फूटपाथवर पार्किंगची व्यवस्था असेल व त्यातून महापालिकेला महसूल मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ‘व्हीएनआयटी’तील ‘अर्बन लॅब-१’चे ‘ऑनलाईन’ माध्यमातून त्यांनी उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.
केंद्र व राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे अनेकदा विकासकामांना उशीर होतो. शहरांचा शाश्वत विकास ही काळाची गरज आहे. अशाप्रकारच्या विकासासाठी निधी उपलब्ध करणारी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळे यापुढे ‘पीपीपी’ किंवा ‘बीओटी’ तत्त्वावर विकास साधला जावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.