गडकरी-मुनगंटीवार-बावनकुळे यांचे प्रयत्ननागपूर : शहरातील प्रसिद्ध ताजबाग दर्गा परिसराचा विकास आणि सौंदर्यीकरणासाठी शासनातर्फे यंदा ३० कोटी रुपये देण्यात येणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निधी देण्यास मान्यता दिली. ताजबागला हा निधी मिळावा म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. सुधाकर कोहळे यांनी विशेष प्रयत्न केले होते.ताजबागच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर सुधार प्रन्यासच्या सभागृहात आढावा सभा घेतली. या बैठकीला आ. सुधाकर कोहळे व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. १३२ कोटींचा हा प्रकल्प असून, ७६ कोटींची कामे झाली आहते. कम्पाऊंड वॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्याचे काम शिल्लक आहे. आठ हायमास्ट लाईटचे काम अपूर्ण आहे. सिमेंट रस्त्याच्या कामासाठी सहा कोटींची गरज आहे. उर्सच्या कम्पाऊंड वॉलचे काम पूर्ण झाले आहे. प्रमुख दर्गाचे सिव्हिलचे काम झाले असून, दगडाचे काम अपूर्ण आहे.या बैठकीत ताजबाग दर्गा परिसरात पादचारी मार्ग, आरसीसी ड्रेन्स, इलेक्ट्रिफिकेशन, प्लम्बिंग आणि कामाच्या निविदांना अंतिम स्वरूप देण्यात आले. ताजबागच्या विकास आराखड्याला १३२ कोटींना शासनाने मंजुरी दिली आहे. या रकमेत सराय इमारतीच्या उर्वरित बांधकामासाठी ६.४० कोटींचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. मोठा ताजबाग परिसरातील १३६ पैकी १३० दुकानांचे काम पूर्ण झाले आहे. या दुकानांचे वाटप व वाटपाचे धोरण निश्चित करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. मोठा ताजबाग येथे दवाखान्यासाठी मनपाने जागा दिल्यास मनपा येथे दवाखाना उभारून देईल. या विकास आराखड्यासाठी सन २०१७-१८ साठी शासनाने ३० कोटी रुपयांना मान्यता दिली आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्था कोराडी या तीर्थस्थळाच्या विकासाच्या धर्तीवर ताजबाग विकास आराखडा संनियंत्रण समितीच्या कार्यकक्षेत काही बाबींचा समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
ताजबाग दर्गा विकासासाठी यंदा ३० कोटी रुपये देणार
By admin | Published: March 28, 2017 2:00 AM