नरेश डोंगरे
नागपूर - पोलीस दलातील वरिष्ठ अन् न्यायपालिकतेतील नामवंतांच्या अवतीभवती घुटमळणारे सफेदपोश दलाल त्यांच्या नावाने कशी तगडी खंडणी उकळतात, ते एका हायप्रोफाईल प्रकरणातुन सोमवारी उघड झाले आहे. या प्रकरणात अनेकांची नावे पुढे येण्याचे संकेत मिळाल्याने सध्या नागपुरातील खंडणीच्या खेळात गुंतलेल्या पांढरपेशांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
जळगाव (खानदेश) येथील साैरभ केसवानी आणि नागपुरातील मद्यविक्रेते मनोज वंजानी (६१) तसेच अशोक वंजानी (वय ६५) हे या हायप्रोफाईल खंडणी प्रकरणातील मास्टर माईंड आहेत. या तिघांच्या साथीला ‘पोलीसमित्र’ सुपारीबाज, हवाला व्यावसायिक आणि अवैध धंदे करणारे ठिकठिकाणचे अनेक जण आहेत. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच नामवंत वकिलांच्या आजुबाजुला घुटमळणाऱ्या दलालांशीही त्यांचे संधान आहे. कुण्या मोठ्या व्यापाऱ्यावर आलेली आफत त्यांच्यासाठी संधी असते. ते ती पद्धतशीर कॅश करतात.
आधी संबंधित व्यापारी, व्यावसायिकांना भीती दाखवायची आणि नंतर त्याच्या नातेवाईकांना पोलीस कारवाईतून मानगुट सोडवून देतो, लवकर जामिन मिळवून देतो, अशी थाप मारून लाखोंची रोकड उकळायची, असा या टोळीचा धंदा आहे. यावेळी या टोळीने शहरातील सुपारीच्या व्यवसायात गुंतलेल्या अनूप नगरियाच्या इंदूरमधील अनिल नामक भावाला आपल्या जाळ्यात ओढले. अनुपला सहिसलामत बाहेर काढण्यासाठी ६० लाखांची खंडणी मागितली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ही खंडणी दिली नाही तर अनुप आयुष्यभर कारागृहातून बाहेर येणार नाही, अशी भीतीही दाखवली. विशेष म्हणजे, कुख्यात वंजानीची अनिल नगरियांसोबत बेलतरोडी पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने भेट घालवून दिली. भीतीपोटी अनिलने पोलीस कर्मचाऱ्याच्या साक्षीने खंडणीचा पहिला ३० लाखांचा हप्ता ३० जानेवारीच्या रात्री वंजानीच्या वाईन शॉपमध्ये पोहचवला.
वंजानीने त्यांचे हवाला करणारे साथीदार नरेश परमारला हे तीस लाख दिले. परमारने ही रोकड रतना राणाला दिली. त्याने एक रुपयाची नोट फाडून त्याचे दोन तुकडे केले. एक तुकडा ३० लाखांसोबत सूरत (गुजरात) मध्ये ब्रजेश पटेलकडे पोहचला. दुसरा एक रुपयाच्या फाटलेल्या नोटेचा तुकडा जळगावमध्ये साैरभ केसवानीकडे गेला. पटेलने ती रोकड चाळीसगावमध्ये संतोष मानधनियाकडे तर मानधनियाने साैरभ केसवानीकडे जळगावला पोहचवली.
हिस्सेवाटणीची रक्कम कुणाकुणाला
केसवानीने ३० लाखांतील काही रक्कम स्वतःकडे ठेवून बाकी लाखोंची रक्कम वंजानीकडे पाठविली. वंजानीने त्या पोलीस कर्मचाऱ्यासह दलालाकडेही त्यांच्या हिस्स्याप्रमाणे दिली. या रकमेचे किती हिस्से झाले आणि पोलीस कर्मचाऱ्यासह आणखी कोण कोण या हिस्सेवाटणीत सहभागी आहे, त्याचा आता पोलीस आयुक्त अमितेशकुमार आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शोध घेत आहेत.
-----