लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरिष्ठांच्या नावाने सुपारी व्यापाऱ्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिसांनी दोन हवाला व्यावसायिकांसह तिघांना अटक केली. नरेश परमार आणि रतन राणा (हवाला) तसेच संतोष मानधनिया अशी या तिघांची नावे आहेत.
परमार आणि राणा ईतवारी, गांधीबागमध्ये हवालाचा व्यवसाय करतात, तर संतोष चाळीसगाव (खान्देश) येथे हवाला चालवतो. या प्रकरणातील मुख्य आरोपी साैरभ केसवानी फरार आहे.
सुपारी व्यापारी अनुप महेशचंद्र नगरिया याला २७ जानेवारीला पोलिसांनी अटक केली होती. तो कारागृहात पोहोचल्यानंतर आरोपी मनोज वंजानी आणि अशोक वंजानी यांनी अनुपचे इंदोर (मध्य प्रदेश) निवासी मोठे बंधू अनिल यांना, “आता तुझा भाऊ कारागृहातून कधीच बाहेर येणार नाही. त्याला बाहेर काढायचे असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरिष्ठांशी संधान साधावे लागेल, असे सांगून ६० लाखांची खंडणी मागितली. हे काम जळगावमधील साैरभ केसवानी हा करून देतो, अशी थाप मारली. साैरभचे व्हॉटस्ॲप कॉलवर नगरियासोबत बोलणे करून दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून नगरिया यांनी ३० जानेवारीला वंजानीच्या मेयो चाैकातील वासन वाईन शॉपमध्ये ३० लाख रुपये आणून दिले. नंतर ते ३० लाख साैरभ केसवानीकडे पोहोचविण्यात आले.
असे फुटले बिंग
दरम्यान, अनुप नगरियाला जामीन मिळाला अन् आरोपी त्याच्या व मोठ्या भावाच्या मागे उर्वरित ३० लाख रुपये मिळावे म्हणून तगादा लावू लागले. नगरिया यांनी आपल्या व्यापारी मित्रांना हा प्रकार सांगितला. त्याची कुणकुण पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना लागली. अमितेशकुमार यांनी अनुप नगरियाकडे चाैकशी केली असता त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊन सोमवारी तशी तक्रार नोंदवली. त्यावरून तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. वंजानी बंधूंनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथके चाळीसगाव, जळगाव, सूरतमध्ये पोहोचली. इकडे परमार आणि राणाला अटक करण्यात आली, तर तिकडे चाळीसगावमध्ये मानधनीयाला अटक करण्यात आली. त्यांना आज नागपुरात आणून न्यायालयात हजर करण्यात आले.
हवाला, दलालांमध्ये खळबळ
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी सेटिंग करून देतो म्हणून शहरात फिरणारे अनेक दलाल आहेत. या दलालांपैकी बहुतांश दलाल हवाला, सुपारी तसेच गैरकाम करणाऱ्या मंडळींशी संबंधित आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात बसून त्यांच्या नावाने ‘सुपारी’ घेण्यात ही मंडळी सराईत आहेत.
या कारवाईमुळे या दलालांचेही बिंग फुटू शकते. ते ध्यानात आल्याने शहरातील हवाला आणि सुपारी व्यावसायिकच नव्हे तर अवैध धंद्यात गुंतलेल्या दलालांमध्येही प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.