आॅनलाईन लोकमतनागपूर :
मिळालेल्या माहितीच्या आधारे पहिली कारवाई बुधवारी रात्री ८.३० वाजता होम प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस-६, बर्थ ५७ वरून करण्यात आली. कारवाईबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी सांगितले की, आरपीएफच्या गुन्हे शाखेला एक व्यक्ती रात्री हवालाची रक्कम घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या चमूने होम प्लॅटफार्मवर पाहणी केली. गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, संजय पुरकाम, विजय पाटील, दीपक वानखेडे, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे यांना रात्री ८.३० वाजता दुरांतो एक्स्प्रेसच्या कोच एस-६ मध्ये एक प्रवासी संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला लगेच ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव महेंद्र तरोडे (२८) रा. अकोला सांगितले. त्याला इंद्रायणी कुरीअरच्या वतीने ७ हजार रुपये वेतन आणि प्रत्येक ट्रीपमागे ७०० रुपये मिळत असल्याचे सांगितले. त्याने काहीच ठोस माहिती न दिल्यामुळे त्याला आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याच्या ट्रॅव्हल बॅगची तपासणी केली असता त्यात ३० लाख रुपये आढळले. त्यात २८ लाख रुपयांच्या २ हजाराच्या नोटा तसेच उर्वरित ५०० रुपयांच्या नोटा आढळल्या. त्याची अधिक चौकशी केली असता संबंधित प्रवाशाने ही रक्कम मुंबईला नेत असल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेच आयकर विभागाला सूचना देण्यात आली. आयकर विभागाची चमू गुरुवारी आरपीएफ ठाण्यात पोहोचल्यानंतर आरोपी आणि रक्कम त्यांच्या सुपूर्द करण्यात आली.