तीन तास रुट मार्च
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत आठवडाभरात तीन खुनाच्या घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेत पाचपावलीच्या डीबी पथकातील ३० अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ हटविले. तसेच गुन्हेगार व अवैध धंद्याविरुद्ध कठोर कारवाईसाठी पोलिसांनी बुधवारी सकाळी तीन तास रुट मार्च केला.
पाचपावली पोलीस ठाणे परिसरात डीबी पथकाच्या निष्काळजीपणामुळे अवैध धंदे जोरात सुरू असल्याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. आठवडाभरात झालेल्या खुनाच्या तीन घटनांनी ही बाब उघड झाली. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पाचपावली पोलीस ठाण्यातील डीबी पथकाच्या कामाचा तात्काळ आढावा घेण्याचे आदेश दिले. अप्पर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि उपायुक्त लोहित मतानी यांनी तीन तास डीबी पथकाच्या कामकाजाचे पोस्टमार्टम केले. त्यांनी डीबी पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना फटकारलेही. दरम्यान, मंगळवारी रात्री पुन्हा एक खुनाची घटना घडली.
पाचपावलीमध्ये डीबीचे सहा पथक होते. यात अधिकारी-कर्मचारीसह ३० जणांचा समावेश होता. बुधवारी सर्वांना हटवून नवीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले. यानंतर डीसीपी लोहित मतानी यांच्या नेतृत्वात क्यूआरटी पथक, पाचपावली आणि शांतिनगर पोलिसांनी रुट मार्च काढला. या रुट मार्चने जवळपास एक तास बंगाली पंजा, नाईक तलाव, मराठा चौक तांडापेठ, चकना चौक, राऊत चौक, लाल दरवाजा, पिवळी मारबत आदी परिसराचे निरीक्षण केले. अवैध धंदे व अल्पवयीन गुन्हेगारांच्या कृत्यावर अधिक लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
बॉक्स
चौकामध्ये पोलीस तैनात
पाचपावली आणि शांतिनगर पोलीस ठाणे परिसरातील संवेदनशील चौकामध्ये पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना विनाकारण घराबाहेर फिरणारे व संशयास्पद व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गोंधळ घालणाऱ्या युवकांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे.