नागपूर : आर्कियॉलॉजी थीम पार्क प्रकल्पाच्या उभारणीसाठी गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाच्या क्षेत्रात खोदकाम करण्यात आले होते. त्यात सापडलेल्या थडग्यात दोन सांगाडे आढळले होते. ते ३ हजार वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज असला तरी त्यांच्या सुरक्षेसाठी कसलीही काळजी घेण्यात आली नाही. यामुळे हा पुरातन ठेवा आज असुरक्षित झाला आहे. (3,000 year old skeletons unsafe; Archaeological theme park in Nagpur in trouble)
तीन वर्षापूर्वी येथे डेक्कन काॅलेज ऑफ ऑर्कियॉलॉजी, पुणे यांच्यासोबत एफडीसीएमने आर्कियॉलॉजी थीम पार्क प्रकल्पाच्या उभारणीसाठी संयुक्त करार केला होता. त्यासाठी केलेल्या खोदकामादरम्यान या परिसरात पुरातन थडगे सापडले होते. मागील दीड वर्षांपासून या प्रकल्पाचे कामच थंड बस्त्यात आहे.
सूत्रांच्या मते, पुरातन वास्तु मिळाल्यास नियमानुसार खोदकामाची जागा सुरक्षित करावी लागते. येथे असे झाले नाही. डेक्कन काॅलेजने पुणे येथील एका एजन्सीला हे काम सोपविले होते; मात्र ते काम पुढे सरकू शकले नाही. यासाठी आता कोरोनाची सबब सांगितली जात आहे.
दिलेल्या निधीतून कंत्राटदाराकडून काम सुरू केले आहे. बराच विलंब झाला, हे मान्य आहे. खोदकामादरम्यान दोन सापळे सापडले. व्हीसीसोबत दोन बैठका झाल्या असून, उर्वरित काम ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा महत्त्वपूर्ण शोध असल्याने नागरिकांनाही उत्सुकता आहे.
- एम. वासुदेवन, व्यवस्थापकीय संचालक, एफडीसीएम.
पर्यटक वाढणार!
गोरेवाडा प्राणी संग्रहालयात वन्यजीवांसोबतच पुरातत्व शोध लागल्याने येथे पर्यटकांचा ओघ वाढू शकतो. या प्रकल्पाला म्हणावा तसा वेग नसल्याने काम थंडावलेले दिसत आहे. अशा प्रकारच्या उत्खननासाठी पुरातत्व विभागाची परवानगी घेतली जाते. या कामासाठीही घेतली असली तरी त्यातील मापदंडाकडे दुर्लक्ष झाले. यामुळे सेंट्रल ॲडव्हाइजरी बोर्ड ऑफ आर्कियॉलॉजी यावर कारवाई करू शकतो.
...