लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील जवळपास एकतृतीयांश वीज ग्राहकांनी अनेक दिवसापासून वीज बिल भरलेलेच नाही. महावितरणनुसार ३ लाख ४६ हजार ११९ वीज ग्राहकांवर तब्बल ३०९.८४ कोटी रुपयाचे वीज बिल थकीत आहे. शहराचाच विचार केला तर शहरात एकूण नऊ लाख ग्राहक आहेत. आता मुख्यालयाच्या निर्देशानुसार मंगळवारपासून थकीत वसुली मोहीम सुरू करण्यात येत आहे. सध्या कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन कापले जाणार नाही. वीज कर्मचारी थेट थकबाकीदार ग्राहकाशी संपर्क साधून त्यांना वीज बिल भरण्याची विनंती करतील.
लॉकडाऊनदरम्यान वीज मीटर रीडिंग बंद असल्याने बिल प्रक्रिया ठप्प होती, नंतर तीन ते चार महिन्याचे बिल एकाच वेळी पाठविण्यात आले. वीज बिलाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी वाढल्या. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने लोकांनी बिल भरणेच बंद केले.नागपूर शहराचा विचार केल्यास येथील २ लाख ९३ हजार ८३१ ग्राहकांनी २३१.७६ कोटी रुपयाचे बिल भरलेले नाही, तर राज्यभरात सहा हजार कोटी रुपयाचे वीज बिल थकीत आहे. अशा परिस्थितीत महावितरणने मंगळवारपासून राज्यभरात थकीत बिल वसुली मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत ग्राहकांशी थेट संपर्क साधून त्यांना बिल भरण्याची विनंती केली जाईल. सध्या कनेक्शन कापले जाणार नाही. परंतु थकीत रक्कम कमी न झाल्यास कनेक्शन कापण्याची मोहीमसुद्धा राबविली जाईल. याासाठी शाखा कार्यालय ते परिमंडळ कार्यालयापर्यंत पथक तैनात करण्यात आले आहे.
महालमध्ये सर्वाधिक थकबाकीशहरात महाल, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स व काँग्रेसनगर या चार डिव्हिजनच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. यापैकी काँग्रेसनगर सोडले तर तिन्ही डिव्हिजन वर्षभरापूर्वीपर्यंत फ्रेन्चाईसीच्या अधीन होते. या चारपैकी महाल डिव्हिजन थकबाकीमध्ये सर्वात पुढे आहे. येथील १ लाख ८ हजार ५५१ ग्राहकांवर ९३.३५ कोटी रुपयाचे वीज बिल थकीत आहे, तर काँग्रेसनगरमध्ये सर्वात कमी थकबाकीदार आहेत. येथे ७७,८६६ ग्राहकांवर ५८.३६ कोटी रुपयाचे बिल थकीत आहे.
कुठे किती थकबाकीडिव्हिजन ग्राहक संख्या थकबाकी (कोटी रुपये)सिव्हिल लाईन्स ९२,६८६ ९७.१३काँग्रेसनगर ७७,८६६ ५८.३६गांधीबाग ६७,०३६ ६०.९९८महाल १,०८,५५१ ९३.३५-------------------------------------एकूण ३,४६,११९ ३०९.८४