लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने शहरातील रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी शहरातील ३०८ अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. यादरम्यान पथकाने ४ ट्रक साहित्य जप्त करून १६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार शहरात अतिक्रमण हटाव कारवाई होत आहे. मंगळवारी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत लक्ष्मीनगर चौक ते प्रतापनगर ते मंगलमूर्ती चौक ते जयताळा चौक दरम्यान ४२ अतिक्रमणे हटविण्यात आली. विक्रेते, ठेलेवाल्यांचे एक ट्रक साहित्य जप्त करून एक हजार दंड वसूल केला.
धरमपेठ झोनच्या पथकाने राणी लक्ष्मीनगर ते एलएडी कॉलेज ते बजाजनगर भागातील फूटपाथवरील ३४ अतिक्रमण हटविण्यात आले.
धंतोली झोनच्या पथकाने त्रिशरण चौक ते रामेश्वरी चौक ते मानेवाडा चौक ते परत रामेश्वरी चौक ते वंजारीनगर ते मेडिकल चौक ते शुक्रवारी तलाव पस्सिरात कारवाई करून ४२ अतिक्रमण हटवून परिसर मोकळा करण्यात आला.
नेहरूनगर झोनच्या पथकाने श्रीकृष्णनगर ते हिवरी नगर चौक ते हसनबाग चौक, ते खरबी चौक ते वाठोडा चौक, वाठोडा रिंगरोड परिसरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंची ५२ अतिक्रमणे हटविली. एक ट्रक साहित्य जप्त केले.
गांधीबाग झोन भागातील कोतवाली ते बडकस चौक परत कोतवाली ते बडकस चौक दरम्यानच्या मार्गावरील ४४ अतिक्रमण हटविले. एक ट्रक साहित्य जप्त केले. परिसरातील ठेले, दुकाने हटविण्यात आली. मंगळवारी झोन भागातील गिट्टीखदान रोड, जरीपटका रोड, नारा रोड भागातील फूटपाथवरील ४६ अतिक्रमणे हटवून १२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.