लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीटी एक्स्प्रेसमध्ये बल्लारशाह ते नागपूर दरम्यान गस्त घालत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी ३०.९५४ किलो गांजा जप्त केला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना जीटी एक्स्प्रेसच्या एस २ कोचमध्ये गांजासारखा वास आला. त्यांनी संशयास्पद वाटणाऱ्या तीन आरोपींची चौकशी सुरू केली. त्यानंतर बॅगमध्ये हात घातला असता कडक वस्तू असल्याचे लक्षात आले. त्यात गांजा किंवा इतर संशयास्पद वस्तू असल्याची शंका आल्यामुळे तिघांनाही अटक करण्यात आली. नागपूर रेल्वेस्थानकावर तहसीलदार सत्यजीत भोतमागे यांच्या देखरेखीखाली बॅगेची तपासणी केली असता त्यात प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेला ३०.९५४ किलो गांजा आढळला. जप्त केलेल्या गांजाची किंमत ३ लाख ९ हजार ५४० रुपये आहे. त्या आधारे आरोपींना अटक करून त्यांना लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपी चंद्रपूरवरून दिल्लीला जात होते. त्यांच्याकडे वारंगल ते दिल्ली असे प्रवासाचे तिकीट होते. यातील दोन आरोपी पश्चिम बंगालचे आहेत. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एल. मीना, उपनिरीक्षक होती लाल मीना, जवान गौतम यांनी पार पाडली.