लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नागपूर विभागातून शेवटच्या दिवशी मुख्य उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत आपापले अर्ज सादर केले. एकूण ३१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहे. नाव मागे घेण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर आहे. त्यानंतरच नेमके किती उमेदवार मैदानात आहे हे स्पष्ट होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करताना माेजक्याच लोकांना प्रवेश देण्यात आला होता. परंतु अनेक उमेदवार आपापले शक्तिप्रदर्शन करीत कार्यालयापर्यंत पोहोचले. यावेळी कोविड बाबत जारी दिशानिर्देशांचे उल्लंघनही झाले. आज १८ जणांनी अर्ज भरले. यात भाजपचे संदीप जोशी, काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यासह विदर्भवादी संघटनांचे नितीन राेंघे यांचा समावेश आहे. इतर उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केले.
दोन संदीप जोशी, दोन अभिजित वंजारी
३१ उमेदवारांमध्ये दोन संदीप जोशी व दोन अभिजीत वंजारी यांचा समावेश आहे. अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांमध्ये भाजपचे संदीप दिवाकर जोशी यांच्या शिवाय अपक्ष म्हणून संदीप रमेश जोशी यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला. यासोबतच काँग्रेसचे अभिजित गोविंदराव वंजारी यांच्यासह त्यांच्या नावाचे अभिजित रवींद्र वंजारी यांनीही अर्ज सादर केला.