योगेश पांडे
नागपूर : मागील वर्षभरात नागपूर मध्यवर्ती कारागृह विविध नकारात्मक बाबींसाठी चर्चेत होते. मात्र क्षणिक संतापामुळे तुरुंगाची हवा खावी लागत असलेल्या अनेक कैद्यांमध्ये ज्ञानगंगेच्या प्रवाहात जाण्याची इच्छा आहेत. यातूनच अनेक कैदी शिक्षण घेत असून या वर्षी ३१ कैदी तुरुंगात राहून पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. प्रामुख्याने एमए करणाऱ्या या कैद्यांचे शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू आहे.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाेन हजार ८०० हून अधिक कैदी शिक्षा भोगत आहे. त्यातील सद्य:स्थितीत २२१ कैदी विविध प्रकारचे शिक्षण घेत आहेत. यात १५ महिला कैदी असून उर्वरित कैदी पुरुष आहेत. कैद्यांकडून घेण्यात येत असलेल्या शिक्षणात पूर्वतयारी अभ्यासक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, बी.ए.चे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष तर एम.ए. मराठी-समाजशास्त्र अभ्यासक्रमाचा समावेश आहे. एकूण कैद्यांपैकी ३१ कैदी हे एम.ए. मराठी, इंग्रजी किंवा एम.ए. समाजशास्त्र यात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. तीन कैदी तर द्वितीय वर्षाला असून ते या वर्षी ‘पोस्ट ग्रॅज्युएट’देखील होतील.
मुक्त विद्यापीठात सर्वाधिक कैदी
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून सर्वाधिक १३८ कैदी शिक्षण घेत आहेत, तर इग्नूतून ८३ कैदी शिकत आहेत. यातील ३३ कैदी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असून उर्वरित सर्व कैदी बीए किंवा एमए करत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
५७ कैदी होणार ‘बी.ए. पास’
दरम्यान, कारागृहातील एकूण ५७ कैदी हे बी.ए.च्या अंतिम वर्षाला आहेत. यातील १० विद्यार्थी ‘इग्नू’तील असून ४७ विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून पदवीच्या मार्गावर आहेत, अशी माहिती कारागृह उपअधीक्षक दीपा आगे यांनी दिली.
कारागृहाचा कोंडवाडा, तरीदेखील अभ्यासाची जिद्द कायम
नागपूर कारागृहात सद्य:स्थितीत क्षमतेपेक्षा खूप जास्त कैदी बंदिस्त आहेत. अशा स्थितीत कैद्यांना अभ्यास करण्यास अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, तरीदेखील कैद्यांची जिद्द कायम आहे. नागपूर कारागृहाची एकूण क्षमता एक हजार ९४० कैद्यांची आहे. त्यात १४२ महिला कैदी सामावल्या जाऊ शकतात. मात्र, प्रत्यक्षात नागपूर मध्यवर्ती कारागृहात ३१ मार्च अखेरीस दाेन हजार ८५९ कैदी शिक्षा भोगत होते. एकूण क्षमतेच्या ४७ टक्के अधिक कैदी कारागृहात असतानादेखील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले कैदी त्यांच्या संकल्पावर कायम असल्याचे चित्र आहे.
अभ्यासक्रम : पुरुष : महिला : एकूण
प्रमाणपत्र : २१ : १२ : ३३
बी.ए. प्रथम वर्ष : ७७ : ३ : ८०
बी.ए.द्वितीय वर्ष : २० : ३ : २०
बी.ए. तृतीय वर्ष : ५७ : ० : ५७
एम.ए. मराठी प्रथम : १६ : ० : १६
एम.ए. इंग्रजी प्रथम : १ : ० : १
एम.ए. इंग्रजी द्वितीय : १ : ० : १
एम.ए. समाजशास्त्र प्रथम : ११ : ० : ११
एम.ए. समाजशास्त्र द्वितीय : २ : ० : २