कोंढाळी : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन भरधाव एसटी बसला समोरासमोर जबर धडक बसली. त्यात दोन्ही बसमधील ३१ प्रवासी जखमी झाले. अपघाताची ही घटना कोंढाळी-काटोल मार्गावरील चक्रीघाट परिसरात शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.जखमी प्रवाशांपैकी चौघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अन्य जखमींवर कोंढाळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.सिंधू मुंगभाते (३५, रा. शिवा), लक्ष्मी भाऊराव साठोणे (५८, रा. काटोल), अशोक हैबतराव डेंगे (५३, रा. शिवा) व राहुल शंकर जोगी (१६, रा. कोंढाळी) अशी गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची नावे आहेत. अन्य जखमींना कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघातग्रस्त दोन्ही एसटी बस काटोल आगाराच्या आहेत. कोंढाळी-सावनेरला जाणारी एमएच-४०/एन-९५५८ क्रमांकाची बस कोंढाळी येथून सकाळी ९.५५ वाजता १९ प्रवाशांना घेऊन काटोलमार्गे सावनेरकडे रवाना झाली. दरम्यान, कोंढाळीपासून ३ किमी अंतरावरील चक्रीघाट परिसरात काटोल-वर्धा ही एमएच-४०/८५६४ क्रमांकाची बस कोंढाळीकडे येत असताना चक्रीघाटातील वळणावर दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक बसली. सदर काटोल-वर्धा बसमध्ये ४१ प्रवासी प्रवास करीत होते. दोन्ही बसच्या भीषण धडकेनंतर काटोल-सावनेर ही बस घाटातील सुरक्षा भिंत तोडत सुमारे १०० मीटर अंतरावर जाऊन उभी राहिली तर काटोल-वर्धा ही बस तेथेच उभी होती. या अपघातात काटोल-सावनेर बसच्या चालकाच्या सीटमागे बसलेले प्रवासी सिंधू मुंगभाते व अशोक डेंगे हे दोघे चालकाच्या सीटमागे फसले गेले. बसमधील काटोल आगाराचे वाहतूक नियंत्रक गुड्डू पठाण, वासुदेव गिरडकर व वाहक संजय बांबल यांनी बसचे टिनपत्रे तोडून प्रवाशांना बाहेर काढले. तसेच बसमधील अन्य जखमींना प्राथमिक आरोग्य केेंद्रात रवाना केले. सर्व जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. यातील चौघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना लागलीच नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कोंढाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. ठाणेदार प्रदीप चौगांवकर, हेड कॉन्स्टेबल सुरेश लांडे, रमेश पालवे, विकास काकडे व कोंढाळीतील तरुण कार्यकर्त्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. मिळेल त्या वाहनाने जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. काटोल आगाराचे सहायक वाहतूक निरीक्षक रमण मनकवडे, लेखाकार गजेंद्र फुलपेयर यांनी तत्काळ आरोग्य केंद्र गाठून जखमी असलेल्या १४ प्रवाशांना आर्थिक मदत दिली. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी दोन्ही बसचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून तपास सुरू केला आहे.
अपघातात ३१ प्रवासी जखमी
By admin | Published: September 18, 2016 2:25 AM