नागपूर : स्कूल व्हॅनची आसन क्षमता मूळ आसन क्षमतेच्या दीडपट म्हणजे ‘दहा’ अधिक ‘एक’ अशी असताना शेळ्यामेंढ्या कोंबाव्यात तशाप्रकारे तब्बल ३१ विद्यार्थी बसविलेल्या स्कूल व्हॅनवर बुधवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई केली. विद्यार्थ्यांना शाळेत सोडून आरटीओच्या पथकाने स्कूल व्हॅनच जप्त केली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम आहेत. या नियमांवर बोट ठेवून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने (आरटीओ) कारवाईची मोहीम सुरू आहे. मात्र, त्यानंतरही नियमांना धुडकावून शेकडो स्कूल बस व व्हॅन रस्त्यावर धावत आहे. बुधवारी आरटीओच्या वायुवेग पथकाकडून कामठी रोडवर वाहनांची तपासणी सुरू असताना स्कूल व्हॅनला थांबविण्यात आले. आत विद्यार्थ्यांची संख्या पाहताच पथकातील मोटार वाहन निरीक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. हे विद्यार्थी कामठी येथील अविनाश पब्लिक स्कूलचे होते. मोटार वाहन निरीक्षक वीरसेन ढवळे व सहायक मोटार वाहन निरीक्षक सूरज मून यांनी प्रसंगावधान राखून स्कूल व्हॅन शाळेत नेण्यास सांगितले. मागे आपले वाहन ठेवले. शाळेत सर्व विद्यार्थ्यांना सोडून दिल्यानंतर स्कूल व्हॅन पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयात जप्त करण्यात आली.
- तीन वर्षांपासून फिटनेस सर्टिफिकेटच नाही
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत मागे झालेल्या शालेय परिवहन समितीच्या बैठकीत सर्व स्कूल व्हॅन व बसला १५ सप्टेंबरपर्यंत फिटनेस सर्टिफिकेट घेण्याची वाढीव मुदत दिली. अमानवीय कृत्य करणाऱ्या कोणत्याही स्कूल बस किंवा व्हॅनवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले. परंतु, त्यानंतरही काही स्कूल व्हॅन व बसेस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.
- मूळ आसनामध्येच केला बदल
कारवाई करणारे मोटार वाहन निरीक्षक वीरसेन ढवळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, स्कूल व्हॅनमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी चालकाने मूळ आसनामध्ये बदल केला. दप्तरे ठेवण्यासाठी जागा नसल्याने विद्यार्थी मांडीवर दप्तर घेऊन अक्षरश: एकमेकांच्या अंगावरच बसले होते. काही विद्यार्थी चालकाला खेटून बसले होते. पहिली ते नवव्या वर्गाचे हे विद्यार्थी होते.
- पालकांनीही जोखीम घेऊ नये
नोकरी, व्यवसायामुळे पालकांना मुलांना वेळेत शाळेत पोहोचिवता येत नाही. त्यामुळे वाहतूक सुविधेचा पर्याय स्वीकारला जातो; परंतु आपला मुलगा शाळेत कसा जातो, याबाबत पालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. ज्या वाहनातून मुलगा शाळेत जातो, त्यात किती विद्यार्थी बसविले जातात, चालकाचे वर्तन, आदींची माहिती घेणे आवश्यक आहे. कमी पैशात वाहतूक होत असल्याने मुलांच्या जिवाची जोखीम घेऊ नये, असे आवाहनही आरटीओने केले आहे.
- वाहन परवानावरच कठोर कारवाई
क्षमतेपेक्षा तिप्पट विद्यार्थी बसवून प्रवास करणारी स्कूल व्हॅन जप्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आणणाऱ्या अशा स्कूल व्हॅन व स्कूल बसवर जरब बसावा म्हणून वाहन परवानावरच कठोर कारवाई केली जाईल. स्कूल बस व स्कूल व्हॅनची ही मोहीम अशीच निरंतर सुरू राहील.
- रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी