निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्याघ्र संवर्धनाकडे जबाबदारीने लक्ष देतानाच इतर प्राण्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष हाेत आहे की काय, असे म्हणण्याची स्थिती दिसून येत आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण साेसायटी (डब्ल्यूपीएसआय) च्या नुकत्याच आलेल्या बिबट्यांच्या अहवालानुसार धक्कादायक बाब उघड हाेत आहे. यावर्षी गेल्या सहाच महिन्यात देशात ३१० बिबट्यांचे बळी गेले आहेत. आणखी चिंताजनक म्हणजे यात सर्वाधिक ९५ मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत.
दाेनच वर्षांपूर्वी २०१८मध्ये भारतीय वने व पर्यावरण मंत्रालयाने देशात बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढल्याची प्रशंसनीय माहिती मांडली हाेती. म्हणजे २०१४ मध्ये ७,९१० असलेली बिबट्यांची संख्या २०१८मध्ये १२,८५२ वर पाेहोचल्याची ही बातमी हाेती. यामध्ये मध्यप्रदेश व कर्नाटकनंतर १,६९० बिबट्यांसह महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, या आनंदी बातमीकडे लक्ष देताना देशात व विशेष म्हणजे महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात बिबट्यांच्या मृत्यूत ५७ टक्क्यांची वाढ झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. २०२१मध्ये गेल्या सहा महिन्यात देशाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश ४१, उत्तराखंड ३८, राजस्थान २४ आणि जम्मू काश्मीरमध्ये २० बिबट्यांच्या मृत्यूची नाेंद केली आहे. राज्यात १८० दिवसात ९५ म्हणजे दर दाेन दिवसांनी एका बिबट्याचा मृत्यू असे म्हणावे लागेल. यामध्ये ५१ नैसर्गिक, ३६ अपघाती, तर दाेन बिबट्यांची शिकार झाल्याचे समजते.
२०२१ (६ महिने) ३१० २०२० : ४३५ २०१९ : ४९४
महाराष्ट्रात १० वर्षात मृत्युचा वाढता आलेख
वर्ष मृत्यू नैसर्गिक अपघाती
२०१० ३०
२०११ ३४
२०१२ ४३
२०१३ ३६
२०१४ ४१
२०१५ ४६
२०१६ ८९ ५३ २९ (७ शिकार)
२०१७ ८६ ५५ २१ (९ शिकार)
२०१८ ८८ ५४ २७
२०१९ ११० ३५
२०२० १७२ ८० ६४
अपघाती मृत्यू वाढले
गेल्या काही वर्षात प्राण्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बिबट्यांच्या बाबतीत २०१८पासून हा आकडा वाढलेला दिसताे. रस्ते व रेल्वे अपघात, खुल्या विहिरीत पडणे आणि श्वानांच्या हल्ल्यात मारले जाण्याचे कारणे आहेत. २०१८मध्ये २७, २०१९मध्ये ३५, तर २०२०मध्ये ६४ बिबट्यांनी अपघातात जीव गमावला. याशिवाय प्राण्यांचे अधिवास नष्ट हाेणे, मानवी हस्तक्षेप व नैसर्गिक स्रोतांवर वाढलेला दबाव महत्त्वाची कारणे आहेत. गेल्या वर्षी रस्ते रुंदीकरणाची १५,००० किमीची कामे देशात झाली.
गेल्या सहा महिन्यात १५००० किलाेमीटरचे रस्ते रुंदीकरण झाले. जंगलातही रस्त्यांचे नेटवर्क प्रचंड वाढले आहे. छत्तीसगड ते पांढरकवडा रस्त्याचे उदाहरण घेता येईल. त्यामुळे जंगलातील गावांचेही शहरीकरण झाले. अतिक्रमण प्रचंड वाढले आहे. जंगलाचे क्षेत्र घटल्याने प्राण्यांना जागाच उरली नाही. शिवाय प्राणी पकडण्यासाठी सापळे रचणे, इलेक्ट्रीफिकेशन करणे प्राण्यांसाठी धाेकादायक ठरत आहे. बिबट्यांची संख्या वाढली म्हणतात पण तेही भ्रम निर्माण करणारे आहे.
- प्रफुल्ल भांबुरकर, वन्यजीव अभ्यासक