कमल शर्मा
नागपूर : राज्यात वीज वितरण यंत्रणेची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. दर महिन्याला महावितरणलाग्राहकांच्या ३.११ लाख तक्रारी येत आहेत. त्याचबरोबर ३.५६ लाख लोकांनी कॉल सेंटरला फोन करून मदत मागितली आहे.
महावितरणकडे येत असलेल्या बहुतांश तक्रारी वीजपुरवठा खंडित होणे व वीजबिलाच्या संदर्भातील आहेत. टॅरिफ बदलणे, नावात बदल, डुप्लिकेट बिल आदी बाबतीत तक्रारी आहेत. २०२१-२२ मध्ये कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावरून २.३१ लाख तक्रारी आल्या होत्या. २२-२३ मध्ये त्यात घट होऊन १.८२ लाख झाली होती. परंतु या वर्षात मेपर्यंत दर महिन्याला सरासरी ३.५६ लाख तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारी निवारण वेळेवर होत नसल्याने लोकांमध्ये रोष निर्माण होत आहे. महावितरणचे अध्यक्ष, सहव्यवस्थापकीय निदेशक लोकेश चंद्र यांनी ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी गंभीरतेने घेतल्या आहेत. त्यांनी राज्यातील सर्व मुख्य अभियंत्यांना तक्रारीकडे वैयक्तिक लक्ष देण्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, ग्राहकांच्या सेवेला प्राथमिकता देणे गरजेचे आहे.
- ग्राहकांना माहितीही दिली जात नाही
मेंटनन्ससाठी वीजपुरवठा बंद ठेवणे अथवा वीजबिलासंदर्भात आवश्यक माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. २०२१-२२ मध्ये महावितरणने १०.२१ लाख ग्राहकांना फोन केले होते. पण २०२२-२३ मध्ये केवळ ५.३२ लाख ग्राहकांनाच फोनवर माहिती देण्यात आली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये हा आकडा एक लाखावर आला आहे.