दयानंद पाईकराव ,नागपूर : घराला कुलुप लाऊन वास्तु समारंभासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घराचे कुलुप तोडून रोख ३.५० लाख रुपये चोरी करणाऱ्या आरोपीला वाडी पोलिसांनी ३६ सीसीटीव्हींचे फुटेज तपासून दोन दिवसात गजाआड केले आहे.
रोहित मोरेश्वर डहाके २९, रा. फुटाळा जुनी वस्ती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी ऋषभसेन राजेशकुमार संघानी (४२, रा. रॉयल ऑर्चिड अपार्टमेंट, वाडी) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह ड्रायव्हरसोबत नातेवाईकांच्या वास्तु समारंभासाठी गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरातील आलमारीतील ३.५० लाख रुपये चोरी केले. या प्रकरणी संघानी यांनी वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वाडी पोलिसांनी दोन दिवस परिसर पिंजुन काढला. तसेच अमरावती मार्गावरील ३२ सीसीटीव्ही कॅमेरा तपासले. संघानी यांच्या ओळखीचे, काम करणारे व कार्यालयातील व्यक्तींवर पाळत ठेवली.
पोलिसांना आरोपी रोहितवर संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी रोहित हा यांच्याकडे मागील ८ वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. आरोपी रोहितकडून रोख २ लाख ४३ हजार ५०० रुपये, घराची चाबी व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकुण ८.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई झोन १ चे पोलिस उपायुक्त अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे, उपनिरीक्षक कुणाल धुरट, हवालदार प्रमोद गिरी, हेमराज बेराल, सतिष येसणकर, प्रवीण फलके, प्रमोद सोनवणे यांनी केली.