नागपूर : उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात गुन्हेगारांना पोलिसांचे काहीच भय राहिले नसल्याचे चित्र आहे. पांढरपेशांची वस्ती असलेल्या इंद्रप्रस्थ ले आऊटमध्ये चोरट्यांनी एका घरात शिरून ८२ वर्षीय सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याचे हातपाय बांधून ३२ लाखांची लूट केली. तसेच आरोपींनी त्यांच्यावर चाकूनेदेखील वार केले. या प्रकारामुळे इंद्रप्रस्थ ले आऊटमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांकडून गस्त होत नसल्याचा हा परिणाम असल्याची ओरड करण्यात येत आहे.
सुरेश सदाशिव पोटदुखे (८२) हे इंद्रप्रस्थ ले आऊट येथील रो हाऊस क्रमांक तीन येथे राहतात. त्यांचा मुलगा व पत्नी अमेरिकेला असल्याने ते सध्या एकटेच असतात. मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास ते त्यांच्या घरी बेडरूममध्ये एकटेच झोपले असताना तीन अज्ञात आरोपी मागील लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून आत आले. त्यांनी लाकडी दरवाजाचे सेंट्रल लॉकदेखील तोडले. त्यानंतर त्यांनी पोटदुखे यांना मारहाण केली व त्यांचे हातपाय कपड्याने बांधून लॉकरची चाबी मागितली. पोटदुखे यांनी ती बॅंकेतील लॉकरमध्ये असल्याचे सांगितल्यावर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कंबरेवर चाकूने वापर करण्यात आले. यात ते गंभीर जखमी झाले. चोरट्यांनी आलमारीतील सामानातून तिजोरीची चाबी शोधली व त्यातील २५ लाख रुपये रोख तसेच १५ तोळे सोन्याचे दागिने व दोन किलो चांदिचे दागिने असा एकूण ३२ लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल चोरून नेला. ही बाब कळताच पोटदुखे यांना तातडीने एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांची गस्तच नाहीइंद्रप्रस्थ ले आऊट, भेंडे ले आऊट, इंद्रप्रस्थ नगर, सहकार नगर हा पूर्णत: रहिवासी भाग असूनदेखील तेथे पोलिसांची हवी त्या प्रमाणात गस्त नसते. याशिवाय ऑरेंज स्ट्रीटवर भेंडे ले आऊट चौकात मागील काही दिवसांपासून खाद्यपदार्थांच्या ठेल्यांचे अतिक्रमण झाले असून तेथे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरूण येऊन उभे राहतात. पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही बाब आता तरी गंभीरतेने घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मोबाईल पळविलाचोरट्यांनी पोटदुखे यांचा मोबाईल पळविला व त्यामुळे सकाळी आठ वाजेपर्यंत त्यांना कुणाशीच संपर्क करता आला नाही. शिवाय पोटदुखे यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरा घुसण्यापूर्वी गुन्हेगारांनी वाकवला होता. यामुळे त्यांचे चेहरे त्यात आले नाही. ते दुचाकीवरून येताना फुटेजमध्ये दिसले.