सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मे २०२० ते १८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एकट्या मेडिकलमध्ये ३२० अशी प्रकरणे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत कोरोनाचे ४२५३ बळी गेले. यात ‘‘ब्रॉट डेड’’ची टक्केवारी ७.५२ टक्के एवढी आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्गाला मार्च महिन्यापासून सुरुवात झाली. मेडिकलमध्ये मे महिन्यात पहिल्यांदाच मृत होऊन आलेल्या (‘ब्रॉट डेड’) रुग्णाची तपासणी केल्यावर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अशी प्रकरणे वाढत गेली. जुलै महिन्यात ४, ऑगस्ट महिन्यात ८४, सप्टेंबर महिन्यात ११७, ऑक्टोबर महिन्यात ६६, नोव्हेंबर महिन्यात २२, डिसेंबर महिन्यात १६, जानेवारी महिन्यात ५ तर १८ फेब्रुवारीपर्यंत ५ ‘ब्रॉट डेड’ रुग्णांची नोंद झाली. कोरोनाबाधित मृतदेहाचे शवविच्छेदन करू नये, असे ‘आयसीएमआर’चे निर्देश आहेत. यामुळे मृतदेह थेट महानगरपालिकेच्या हवाली करून त्यावर अंत्यसंस्कार केले जात आहे. बाधित मृतदेहाचे शवविच्छेदन होत नसल्याने वैद्यकीय तज्ज्ञाना मृत्यूमागील कारणांचा शोध घेणेही अवघड झाले आहे.
- ४० ते ७० वयोगटातील संख्या अधिक
मेडिकलमध्ये दहा महिन्यात ४० ते ७० वयोगटातील कोरोनाबाधित ‘ब्रॉट डेड’ची संख्या मोठी आहे. धक्कादायक म्हणजे, ग्रामीण किंवा इतर राज्याच्या तुलनेत नागपूर शहरातील संख्या वाढल्याचेही सामोर आले आहे. यावरून महानगरपालिका घरोघरी जाऊन सर्व्हे करीत नसल्याचे यावरून दिसून येते.
‘ब्रॉट डेड’ मागील दोन कारण
तज्ज्ञाच्या मते, कोरोनाचा ‘ब्रॉट डेड’ मागील दोन कारणे दिसून येत आहे. पहिले म्हणजे, लक्षणे दिसूनही अनेक रुग्ण घरीच स्वत:हून उपचार घेतात. रुग्णालयात जाण्याचे टाळतात. दोन ते तीन दिवसानंतर प्रकृती गंभीर झाल्यास रुग्णालयात येतात. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला असतो. दुसरे कारण म्हणजे, कोरोनाबाधित रुग्ण शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासणीकडे दुर्लक्ष करतात. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तरी त्यांना लक्षणे दिसून येत नाही. जेव्हा ते अचानक कोसळतात तेव्हा रुग्णालयात येतात. तोपर्यंत उशीर झालेला असतो. याला ‘हॅपी हायपोक्सिया’ म्हणतात.
-ऑक्सिजन अभावी रुग्णवाहिकेतील प्रवासही धोकादायक
कोरोनाबाधित रुग्णांचा एका रुग्णालातून दुसऱ्या रुग्णालयात किंवा घरातून रुग्णालयात येईपर्यंत विना ऑक्सिजन रुग्णवाहिकेतील प्रवासही ‘ब्रॉट डेड’ला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. विशेषत: रुग्णवाहिकेतील पाच तासांपेक्षा जास्त प्रवास धोकादायक ठरण्याची अधिक शक्यता असते.