लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरातील मागील तीन वर्षांत वन्यजीवांचा रेल्वे ट्रॅकवर झालेला मृत्यूचा आकडा डोळे विस्फारायला लावणारा आहे. मागील तीन वर्षांतील हा आकडा ३२ हजारांच्या घरात असून, यात वाघ, सिंह, बिबट यासह अस्वले, हरिण, गवे, मोर यासारख्या अनेक प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा समावेश आहे. चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावर वाघाच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हा विषय आता अधिकच गंभीर ठरायला लागला आहे.
२०१९ मध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सभागृहात एका प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे. या माहितीनुसार, २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत गुरेढोरे, सिंह वाघ आणि बिबट्यांसह ३२ हजारांपेक्षा जास्त प्राणी रेल्वे ट्रॅकवर अपघातात मृत झाले. विशेष म्हणजे यात आसाम, ओरिसासह अन्य राज्यांत हत्तींचाही समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. आतापर्यंत ६० आणि यावर्षी जून २०२० पर्यंत पाच हत्ती ठार झाल्याची नोंद रेल्वे विभागाकडे आहे.
मागील काही वर्षांत वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वेचे जाळे वाढत आहे. कमी खर्चात, जलदगतीने आणि जंगलातून जाणाऱ्या कमी अंतराच्या रेल्वेचे जाळे विस्तारत आहे. मागील काळात गोंदिया-वडसा-चंद्रपूर हा रेल्वेमार्ग तयार झाला. चंद्रपूर ते गोंदिया हा नॅरोगेज ब्रॉडगेज झाला. अमरावती-मेळघाट हा नॅरोगेजही ब्रॉडगेज होत आहे. नागपूर-यवतमाळ-नांदेड हा रेल्वेमार्गही जंगलातून जाणार आहे. या नव्याने होणाऱ्या मार्गांवर असलेल्या वनक्षेत्रातून रेल्वे जाताना या ठिकाणी खबरदारी घेतली जावी, वेगमर्यादा कमी असावी, रुळावर खाद्यपदार्थ फेकू नये, रुळावर वन्यजीव असल्यास तशी सूचना देणारी अत्याधुनिक सूचना यंत्रणा लावणे रेल्वेला बंधनकारक केले जावे, वन्यजीव व्यवस्थापन आराखडा तयार करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आपण यापूर्वीच केल्याचे ग्रीन प्लानेट सोसायटीचे प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रेल्वे प्रशासनासह राज्य, केंद्रीय वन्यजीव विभाग, व्याघ्र प्राधिकरण यांच्याकडेही ही मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’कडे प्रतिक्रिया देताना वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे महाराष्ट्र समन्वयक प्रफुल्ल भांबूरकर म्हणाले, रेल्वे रुळावरील वन्यजीव मृत्यूंची संख्या गंभीर रेल्वेने जंगलातून जाणाऱ्या सर्व मार्गांसाठी दर कि.मी. अंतरात अंडरपास द्यावे, मार्गाला जाळीचे कुंपण केले जावे, रात्री व दिवसा ताशी गती निर्धारित केली जावी. लाइन कन्वर्शन होताना याची खबरदारी रेल्वेने घ्यावी. तसा पत्रव्यवहार होऊनही रेल्वे खाते मात्र गंभीर नाही, त्याचा हा परिणाम आहे.
...
रेल्वे ट्रॅकवरील प्राणी मृत्यूची आकडेवारी
वर्ष : प्राणी
२०१६ : ७,९४५
२०१७ : ११,६८३
२०१८ : १२,६२५
२०१९ : ३,४७९
...
चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्ग ठरतोय संवेदनशील
चंद्रपूर-गोंदिया हा रेल्वे मार्ग अलीकडे या बाबतीत संवेदनशील ठरायला लागला आहे. या रेल्वे मार्गावर दोन दिवसांपूर्वी वाघाचे बछडे मारले गेले. यापूर्वी चंद्रपूरजवळ २०१३ मध्ये २ आणि २०१८ मध्ये वाघांचे ३ बछडे चिरडले गेले. गवे, बिबट, हरिण आणि अनेक लहान वन्यजीव रोज कुठे ना कुठे चिरडले जातात. तक्रारी करूनही रेल्वे आणि वन्यजीव विभाग फारसे गंभीर दिसत नाही.
...