आनंद डेकाटेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. परंतु अजूनही हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. एकट्या नागपूर विभागाचाच विचार केला तर विभागातील तब्बल ३१,९३० लाभार्थी शेतकरी अजूनही राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११,६७५ लाभार्थी शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर वर्धा येथील ६,०३३, भंडारा येथील ५,४९० शेतकऱ्यांचा क्रमांक लागतो.या योजनेंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. या योजनेत कुणालाही अर्ज करायचा नाही. केवळ आधार प्रमाणिकरण करायचे आहे. ज्यांचे आधार प्रमाणिकरण असेल त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. नागपूर विभागाचा विचार केला तर नागपुरातील बँकांकडून या योजनेसाठी एकूण २ लाख ४४ हजार १४० शेतकऱ्यांचे खाते अपलोड करण्यात आले होते. यापैकी २ लाख २८ हजार ६१८ खाते आधारप्रमाणिकरणासाठी प्राप्त झाले. यापैकी २ लाख १६ हजार १६० शेतकऱ्यांचे खाते प्रमाणिकरण झाले. या प्रमाणिकरण झालेल्या खात्यापैकी १ लाख ८४ हजार २३० सभासदांच्या खात्यात शासनाने रक्कम जमा केली म्हणजेच ही खाती कर्जमुक्त झाली. ३१ हजार ९३० लाभार्थी शेतकरी अजूनही कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. नागपूर विभागात आतापर्यंत एकूण १२६८ कोटी लाख रुपयांची कर्जमाफी झालेली आहे.१२,४५८ लाभार्थी शेतकरी आधार प्रमाणिकरणात अडकलेयाशिवाय नागपूर विभागातील १२,४५८ लाभार्थी शेतकरी हे आधार प्रमाणिकरणात अडकले आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ३,०४५, वर्धा ३,३००, भंडारा २,८४९, गोंदिया १,०५९, चंद्रपूर १,९२२ आणि गडचिरोली येथील २८३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.