लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी छापेमारी करून हातभट्टीची ३,२४३ लिटर दारू जप्त केली. २२२ गुन्हे दाखल करून १७१ आरोपींना अटक केली, अशी माहिती या विभागातर्फे द्वितीय निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी आज पत्रकारांना दिली.उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी भल्या सकाळी सावनेर तालुक्यातील तिळंगी खेडेगावात छापा घालून ३०० लिटर मोहाची दारू पकडली. या ठिकाणी १०,७५० लिटर दारू गाळली जाईल इतका सडवा जप्त केल्याची माहिती कोरे यांनी दिली. तिळंगी येथे मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू काढली जाते, अशी माहिती मिळाल्याने विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी तेथे कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, भरारी पथकाचे निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे, द्वितीय निरीक्षक मुकुंद चिटमटवार, रवींद्र सोनोने, सागर ढिंडसे, चव्हाण, संजय राठोड, सुधीर मानकर, मुकेश गायधने, रमेश कांबळे, देवेश कोटे, मिलिंद गायकवाड आदींच्या पथकाने शनिवारी सकाळी तिळंगीत छापा मारून ६६ ड्रम, १३ टाक्यांमध्ये साठविलेली ३०० लिटर दारू आणि सडव्यासह २ लाख ४३ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे रावसाहेब कोरे यांनी सांगितले.यासंबंधाने उपस्थित झालेल्या प्रश्नावर त्यांनी निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून ४ एप्रिलपर्यंत १११ लिटर विदेशी, ५६२ लिटर देशीदारू तर ३,२४३ लिटर हातभट्टीची दारू जप्त केल्याचे सांगितले. सोबतच ५१,१८० लिटर सडवा, ५० लिटर ताडी, ५ टन काळा गूळ आणि ९ वाहने असा एकूण २५ लाख ८५ हजार ८८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचीही माहिती कोरे यांनी पत्रकारांना दिली. या कालावधीत २२२ गुन्हे दाखल करून १७१ आरोपींना अटक करण्यात आली. निवडणुकीमुळे अवैध दारू विक्रीला सर्वत्र उधाण येते, त्यासंबंधाने विभागातर्फे पूर्णत: खबरदारी घेतली गेली असून, दारू उत्पादक कंपन्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तर दुकानांवर भरारी पथकाच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.या कालावधीत सरासरी ३० टक्के दारू विक्री वाढल्याचेही कोरे यांनी सांगितले.सावजींना परवाने मिळणारसावजी हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू चालते. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या सावजी हॉटेलवाल्यांना आता परवाने दिले जाणार आहे. संबंधितांना जागेचा, व्यवसायाचा वाणिज्य परवाना सादर करावा लागेल, अशी माहिती कोरे यांनी दिली. यासंबंधाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तसा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.दारूसाठी आणलेला गूळ बनला पशूंचे खाद्य!हातभट्टीची दारू गाळण्यासाठी खास मध्य प्रदेशातून आणला जाणारा काळा गूळ उत्पादन शुल्क विभागाने २५ आणि २७ मार्चला जप्त केला होता. हा चार टन गूळ अखाद्य (खाण्याजोगा नाही) असल्याचा निर्वाळा संबंधित प्रशासनाने दिला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार, हा चार टन गूळ पशूंना खाऊ घालण्यासाठी विकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रावसाहेब कोरे यांनी पत्रकारांना सांगितले.