लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर शहरात मृत्यू आणि रुग्णसंख्येचा ग्राफ वाढतच चालला आहे. मागील सहा दिवसांचाच विचार करता २७ हजार ९३७ पॉझिटिव्ह आढळून आले, तर ३२६ लोकांचे जीव घेतले. सर्वाधिक ५२ जणांचे बळी महापालिकेच्या हनुमाननगर झोनमध्ये गेले आहेत.
१६ ते २१ एप्रिलचा विचार करता शहरात दररोज ४५०० ते ५००० हजारांच्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, मृत्यूचा आकडा हा ४० वरून ६० पर्यंत पोहोचला आहे. १८ एप्रिलला तर शहरात ७७ जणांचा मृत्यू झाला. शहरातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मिळत नसल्याने मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. घरीच उपचार घेताना प्रकृती गंभीर झाल्यानंतर ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मिळत नसल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे.
गुरुवारी सर्वाधिक ९०१ पॉझिटिव्ह हनुमानगर झोनमध्ये आढळून आले. तर, ७ जणांचा मृत्यू झाला. लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक १२ जणांचा मृत्यू झाला. या झोनमध्ये ७१० पॉझिटिव्ह आढळून आहे.