५८.२४ लाख रुपयांची कर्जमाफी : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची माहिती नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक, नरखेड आणि हिंगणा तालुक्यातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या ३२६ शेतकऱ्यांच्या ५८.२४ लाख रुपयांची कर्ज माफी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी उपरोक्त माहिती दिली. या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी रतनसिंह यादव, एस.डब्ल्यू. सुसदकर, सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक टी.एन. चव्हाण, जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले उपस्थित होते.या बैठकीत कर्जाची माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला व प्रकरणे मंजूर करण्यात आली. तालुक्यातील शिल्लक प्रकरणे तालुकास्तरीय समितीने तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी. जिल्ह्यातील संबंधित परवानाधारक सावकारांनी त्यांच्या स्तरावरील पात्र कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज मंजुरीचे प्रस्ताव संबंधित तालुक्यातील सहायक निबंधकाकडे सादर करावे, असे आवाहनही सचिन कुर्वे यांनी केले. (प्रतिनिधी)
३२६ शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ
By admin | Published: September 03, 2015 2:43 AM