उमरेड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गांगापूर फाटा परिसरात बुधवारी (दि. २) कारवाई करीत दारूचे अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. वाहनचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून देशी दारूच्या ३३ पेट्यांसह एकूण ४ लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
गाैतम वामन काटकर (२३, रा. माजरी, ता. भद्रावती, जिल्हा चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी वाहनचालकाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरेड परिसरात गस्ती असताना त्यांना या भागातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यांनी संशयाच्या बळावर गांगापूर फाटा परिसरात एमएच-४९/डी-१३०३ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन थांबवून झडती घेतली.
त्या वाहनात त्यांना ताडपत्रीखाली देशी दारूच्या ३३ पेट्या ठेवल्याचे आढळून आले. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ती दारू दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी नेली जात स्पष्ट हाेताच त्यांनी वाहनचालक गाैतम यास अटक केली. त्याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांचे वाहन आणि ९९ हजार रुपये किमतीची देशी दारू असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.