नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सलग तिसऱ्या दिवशी हजारावर बाधितांची भर पडली. तीन दिवसांत ३३७१ रुग्ण व २९ मृत्यूची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळून आले. शुक्रवारी १०७४ पॉझिटिव्ह रुग्ण व ६ बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या १४७९०५ तर मृतांची संख्या ४३२० झाली. विशेष म्हणजे, आज कोरोना चाचण्यांचा विक्रम झाला. १२३९६ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली.
नागपूर जिल्ह्यात ८५४१ आरटीपीसीआर तर ३८५५ रॅपिड अँटिजन चाचण्या झाल्या. आतापर्यंतच्या या दोन्ही चाचण्यांचा उच्चांक आहे. चाचण्यांची एकूण संख्या १२१८७०८ झाली. आज आरटीपीसीआरमधून १०२३ तर अँटिजेनमधून ५१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. चाचण्यांच्या तुलनेने बाधितांचा दर ८.६६ टक्के आहे. पुढील दोन दिवस सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे व नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचा परिणाम, पुढील काही दिवसांत रुग्णसंख्येवर होण्याची शक्यता आहे.
-शहरात ८३७, ग्रामीणमध्ये २३४ रुग्ण
शहरात आज कोरोनाचे ८३७, ग्रामीण भागात २३४ तर जिल्हाबाहेर ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मृतांमध्ये शहरातील २, ग्रामीणमधील १ तर जिल्हाबाहेरील ३ आहेत. आतापर्यंत शहरातील बाधितांची संख्या ११८०३८ झाली असून, २७९४ मृत्यू नोंदविण्यात आले. ग्रामीणमध्ये २८९३० रुग्ण व ७७१ मृत्यू आहेत.
-५१२२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये
रुग्णसंख्या वाढत असताना आज ८८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १३६१४० रुग्णांनी कोरोनावर मात केली. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९२.०५ टक्के आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील १०९५७८, तर ग्रामीणमधील २६५६२ रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ७४४५ झाली आहे. यातील २३२३ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात तर ५१२२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.
-दैनिक चाचण्या : १२३९६
-बाधित रुग्ण : १४७९०५
_-बरे झालेले : १३६१४०
- उपचार घेत असलेले रुग्ण : ७४४५
- मृत्यू : ४३२०