नागपूर : रागाच्या भरात अनेक बालक घर सोडून निघून जातात. अनेकजण गर्दीत हरवितात. अशा अल्पवयीन बालकांसाठी ‘नन्हे फरिश्ते’ अभियान राबवून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने ३३८ बालकांची सुटका करून त्यांना सुखरुप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाने ‘नन्हे फरिश्ते’ अभियानांतर्गत १९३ बालक आणि १४५ बालिकांना रेस्क्यू करून अशासकीय संघटना व त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. अभियानांतर्गत रेल्वेस्थानक, परिसरात, रेल्वेगाड्यात कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान एकटाने प्रवास करीत असलेल्या बालकांची विचारपुस करतात. ते घरून निघून आले असल्यास किंवा हरविले असल्यास त्यांच्या आईवडिलांशी संपर्क साधून या बालकांना त्यांच्या स्वाधीन करण्यात येते. याशिवाय आरपीएफच्या वतीने अतिसंवेदनशील रेल्वेगाड्यात गस्त घालण्यात येत आहे.
प्रवाशांच्या साहित्याची चोरी, नशा करणारे असामाजिक तत्व, दरोडा आदी घटनांवर अंकुश लावण्यात येत आहे. रेल्वेगाड्यात आणि परिसरात महिलांशी होत असलेल्या छेडछाडीच्या घटनांवरही अंकुश लावण्यात आरपीएफला यश आले आहे. बालकांच्या सुरक्षेसाठी आरपीएफच्या नियंत्रण कक्षात सुरक्षा हेल्पलाईन आणि महिला हेल्पलाईनच्या माध्यमातून २४ तास सेवा देऊन संबंधीत प्रवाशांना त्वरीत मदत पुरविण्यात येत आहे. आरपीएफने सुरु केलेले ‘नन्हे फरिश्ते’ अभियान अल्पवयीन बालकांसाठी वरदान ठरत आहे.