नागपूर : महाज्योतीची स्थापना होऊन चार वर्षे झाली. या चार वर्षात महाज्योतीकडून प्रशिक्षण घेऊन तब्बल ३४ विद्यार्थ्यांनी युपीएससी तर १३१ विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच ९२ विद्यार्थ्यांनी एमएच सेट परीक्षा यशस्वी केली. यासोबतच हजारो विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांसाठीच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. इतकेच नव्हे तर कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून ६,२३५ उमेदवारांना रोजगाराची संधी प्राप्त करून दिली.
इतर मागासवर्गीय (ओबीसी), विमुक्त जाती (व्हीजे), भटक्या जमाती (एनटी), आणि विशेष मागास वर्ग (एसबीसी)प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना २०१९ साली करण्यात आली. २०२० मध्ये संस्थेचे मुख्यालय नागपुरात आले. स्वत:ची इमारत नाही. सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीत मुख्यालयाचा कारभार सुरू झाला. एमपीएससी, युपीएससीसह विविध परीक्षांसाठीचे प्रशिक्षण सुरू झाले आणि कामाला गती मिळाली. युपीएससीच्या परीक्षेसाठी अर्थ सहाय्य केलेल्या एकूण १३७ विद्यार्थ्यांपैकी ३४ विद्यार्थ्यांची विविध प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाली.
एमपीएससी परीक्षेसाठी महाज्योतीने अर्थसहाय्य केलेल्या एकूण ४३७ विद्यार्थ्यापैकी १३१ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र प्रशासनात विविध विभागात प्रशासकीय पदावर अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यातील ६८ विद्यार्थी हे इतर मागास वर्ग, ११ विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती-ब वर्गातील ११ विद्यार्थी, भटक्या जमाती-क मधील १८ तर भटक्या जमाती- ड मधील २० विद्यार्थ्यांचा तसेच विशेष मागास प्रवर्गातील ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यासोबतच पीएसआयपदाच्या परीक्षेत ६१ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. तसेच टॅक्स असिस्टंट परीक्षेत २२, एसटीआय परीक्षेत २०, नेट-सेट- परीक्षेत ९२, बॅंक भरती परीक्षेत २१ आणि पोलीस पोलिस भरती परीक्षेत १९ विद्यार्थ्यांनी मोलाची कामगिरी बजाविली.
बहुजन प्रवर्गातील विद्यार्थी गुणवंत आहेत, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, आयुष्यातील आवाहनाचा सामना करण्याचे बळही आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रशिक्षणासह आर्थिक पाठबळाची साथ देण्याचे कार्य महाज्योती करीत आहे, या कामाला चांगले यश आले असून बहुजन समाजातील मुलं अशीच उत्तरोत्तर प्रगती करतील, असा विश्वास आहे.
- राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती